पांढरवाणीच्या शेतकऱ्यांना रब्बी धान पिकासाठी पाणी द्या – अन्यथा 9 पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा

0
43

यासीन शेख, गोंदिया सालेकसा :- बाघ इटीयाडोह विभाग गोंदिया अंतर्गत सालेकसा तालुक्यातील कालिसरार धरणावरील पांढरवाणी उपसा जलसिंचन योजनेतुन पात्र शेतकऱ्यांना रब्बी धान पिकासाठी तात्काळ पाणी पुरवठा करा अन्यथा उपसा जलसिंचन योजनास्थळी 9 फेब्रुवारी सोमवार पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करू असा थेट इशारा लाभ क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांनी दिला आहे. खरीप हंगामातील धानपिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले. त्यामुळे आता रब्बी हंगामातुन अपेक्षा असतांना पाणी वाटपात शाखा अभियंत्याकडून कुत्रिम समस्या निर्माण केले जात आहे. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावित आहे. शेतकऱ्यांनी याबद्दलचे निवेदन कार्यकारी अभियंता बाघ इटीयाडोह विभाग गोंदिया, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी गोंदिया, उपविभागीय अधिकारी देवरी, तहसीलदार सालेकसा, ठाणेदार सालेकसा, बाघ व्यवस्थापन उपविभाग आमगांव, शाखा अभियंता पुजारीटोला/कालीसरार, सरपंच ग्रा.प. पांढरवाणी यांना दिले आहे. सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणावरील पांढरवाणी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असून, छत्तीसगड राज्याच्या सीमांतस्थळी आहे. लाभ क्षेत्रात 60 टक्के आदिवासी शेतकरी असून त्यांची शेती सुद्धा धरणात संपादित झाली आहे. मात्र बाघ विभागाच्या थातूरमातुर कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावे लागत आहे. धरणात भरपूर पाणी उपलब्ध असून देखील येथील शाखा अभियंता श्री कस्तुरे पाणी वाटपात जाणीव पूर्वक समस्या निर्माण करीत असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत. “लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना उपसा सिंचन व्दारें रोटेशन पद्धतीने पाणी वाटप करण्यात यावे.

“शासनाकडून विज पुरवठा मोफत होत असल्याने काही निवडक मोठया शेतकऱ्यांना सतत पाणी पुरवठा करून छोट्या गरीब शेतकऱ्यांना वंचित केले जाते. “टेकडीवर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करते वेळी प्राधान्य देण्यात यावे. “पाणी वितरणात कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावे. असे निवेदनात नमूद असून पाणी वितरण व्यवस्था संदर्भात 8 फेब्रुवारी पर्यंत निर्णय घेण्यात आले नाही तर 9 फेब्रुवारी पासून उपसा सिंचन योजनेच्या टाक्या समोरच बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिले आहे. निवेदन देते वेळी भिकू रहांगडाले सुरेश थाठमुरा, सकूनलाल थाठमुरा, नणूकलाल फुलकुवर, राकेश फुलकुवर, ओमप्रकाश धुर्वे, शोभेलाल धुर्वे, अजय मडावी, तेजलाल जुळा, राजकुमार नाग, व शेतकरी उपस्थित होते.