किशोर साहू ,मौदा :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत तालुक्यातील ३४ गावांमध्ये कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी ‘कृषी अवजारे बँक’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे नोंदणीकृत महिला बचत गटांना ६० टक्क्यापर्यंत व कमाल २४ लाख रुपये पर्यंत भरीव अनुदान दिले जाणार असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन मौदा तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांनी केले आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ- या योजनेचा मुख्य उद्देश अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पेरणी पासून ते काढणीपर्यंतची सर्व यंत्रसामग्री माफक दरात उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के किंवा जास्तीत जास्त २४ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित यंत्रे, पेरणी यंत्रे, बीबीएफ यंत्र,काढणी पश्चात प्रक्रिया यंत्र इत्यादीसाठी ही योजना लागू आहे. उमेद (एमएसआरएलएम) किंवा माविम (एमएसव्हीआयएम) अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट यासाठी पात्र आहेत. बचत गटात किमान वेगवेगळ्या कुटुंबातील दहा सदस्य असणे अनिवार्य आहे. ही योजना केवल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या गावांसाठीच लागू आहे. इच्छुक महिला बचत गटांनी प्रकल्पाच्या ‘डीबीटी पोर्टलवर’ किंवा महाविस्तार AI मोबाईल एप्लीकेशन द्वारे आवश्यक कागदपत्रासह 5 एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थ्याची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे केली जाईल. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान मौदा तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील यांनी केले आहे.








