प्रश्न असा की या अशा भुक्कड संस्थेस मुळात इतक्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रवेश दिला गेलाच कसा?
उंटाच्या बुडख्याचा मुका घेण्यास जाऊ नये, अशा अर्थाचा एक सच्चा सल्ला ग्राम्य मराठीत दिला जातो. राजधानीत एआय प्रज्ञावंताच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गलगोटियास नामे विद्यापीठाचा उघड झालेला मूर्खपणा पाहता हे ‘विद्यापीठ’ चालवणार्यांस तो कोणी तरी देणे अगत्याचे होते. आपले विद्यापीठ काय, आपली शैक्षणिक उंची काय आणि आपण कोणासमोर काय बोलतो याचे कसलेही भान नसलेल्या या विद्यापीठाचे जे भजे झाले त्यावर संपादकीय भाष्य एरवी अनावश्यकच ठरले असते. कारण अशी दीडदमडीची विद्यापीठे आपल्या देशात गावगन्ना आहेत आणि ती चालवणारे शिक्षणसम्राट तर डझनाच्या भावावर तोलावेत इतके आहेत. पण तरीही या प्रकरणाची दखल घ्यावी लागते. त्याची प्रमुख कारणे तीन. एक त्यामुळे आपल्या देशाचे हसे झाले. तेही आंतरराष्ट्रीय मंचावर आणि जगभरातील ज्ञानवंत महत्त्वाच्या परिषदेसाठी राजधानीत एका मंचावर येत असताना आपली लाज निघाली. दुसरे महत्त्वाचे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वस्त्रहरणाचा उद्योग चीनकडून केला गेला. लाज निघण्यापेक्षाही चीनने ती काढणे हे कदाचित अधिक वेदनादायी. गलवानपासून गलगोटियासपर्यंत चीन काही आपली पाठ सोडण्यास तयार नाही. सलग दुसर्या दिवशीही चीनकडून या विद्यापीठाचे वस्त्रहरण सुरू होते. ते असाहाय्यपणे पाहण्याखेरीज आपल्याकडे अन्य पर्याय उरला नाही. यातील तिसरे कारण याहूनही वेदनादायी. भारताचा अत्यंत तल्लख ‘सर्वम’ एआय या प्रकरणामुळे पार झाकोळून गेला आणि आपल्याविषयी चांगल्यापेक्षा वाईटाचीच चर्चा अधिक झाली. हे असे का झाले?
याचे कारण शिक्षण क्षेत्राकडे आपले सातत्याने होत असलेले दुर्लक्ष. आपल्या शिक्षणव्यवस्थेतून आज्ञाधारक स्वयंसेवक/कार्यकर्ते तयार होतात. प्रज्ञावंत नाहीत. ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रज्ञा असते ते अन्यत्र जातात आणि आपली बौद्धिक उंची वाढवतात. ही बाब गलगोटियास प्रकरण घडत असताना क्षेत्र/परिषदेशी संबंधित अन्य भारतीय व्यक्ती पाहिल्यास कळेल. आनंद देशपांडे, अपर्णा बावा, निकेश अरोरा, सुंदर पिचाई, अरविंद कृष्णा, सत्या नाडेला, लीना नायर, शंतनु नारायण, वसंत नरसिंहन इत्यादी अनेक. हे सर्व आयआयटी वा त्या काळात स्थापन झालेल्या मान्यवर विद्यापीठांचे विद्यार्थी. ‘शनेल’ या अत्यंत उंची ब्रॅण्डसाठी ओळखल्या जाणार्या फ्रेंच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना नायर तर कोल्हापुरात जन्मल्या आणि सांगलीतील वालचंद महाविद्यालयात शिकल्या. ही विद्यापीठे स्थापन झाली त्या काळात शिक्षण हा विषय गांभीर्याने हाताळला जात असे. केवळ होयबा तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते. आज जगातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रमुख हे भारतीय वंशाचे आहेत. ते ज्या काळात शिकले त्या काळात शिक्षणसम्राट उदयास आलेले नव्हते आणि स्वतंत्र विचार करण्यास शिकवणे हे शिक्षण या संकल्पनेत अध्याहृत होते. या सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी जगात नाव काढले. तथापि पुढच्या काळात शिक्षणाचा पोतच बदलत गेला. आधी शिक्षणसम्राटांनी बाजार मांडला आणि नंतर त्या बाजाराचे नियंत्रण ‘गप्प बसा’ संस्कृतीस शिरसावंद्य मानणार्यांकडे गेले. यथावकाश मूलभूत, स्वतंत्र संशोधन आदींचे महत्त्व कमी होत गेले आणि उपयोजिता (अप्लाइड सायन्स) जीवनावश्यक मानली गेली. हा काळ जगात माहिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा. स्वातंत्र्यानंतर तारुण्यात आलेल्या पहिल्या पिढीने ज्याप्रमाणे सरकारी नोकरीत जागा पटकावण्यात धन्यता मानली त्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या उदयकालीन पिढीने सेवा क्षेत्र बळकावण्यात इतिकर्तव्यता मानली. जगातील सर्वाधिक आयटी इंजिनीअर भारतात घडतात; पण या क्षेत्रात एकही उत्पादन भारतीय नाही, याची लाज ना या क्षेत्रात काम करणार्यांनी बाळगली ना देशाचे नेतृत्व करणार्यांस ही उणीव कधी जाणवली. परिणामी संगणक कारकुनांच्या अनेक पिढ्या या देशाने जोजवल्या.
याउपर प्रश्न असा की या अशा भुक्कड संस्थेस मुळात इतक्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रवेश दिला गेलाच कसा? गलगोटियासला केवळ प्रवेश मिळाला असे नाही, तर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी प्रचंड म्हणता येईल असा शामियानाही उभारता आला. हे कसे शक्य झाले? त्यामागे सत्ताधीशांचे लांगूलचालन हे कारण होते किंवा काय याचे उत्तर मिळणार नाही. पण त्यामागे याखेरीज दुसरे कारणही काही आढळत नाही. भले त्यांना नंतर तेथून हुसकावून लावले गेले असेल. पण त्याआधी थर्मोकोलची शालेय दर्जाची विमान प्रतिकृती या आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करणार्या गलगोटियासमुळे निष्कारण आपली लाज गेली. आपले ‘सर्वम’सारखे यश या गलगोटियासने झाकोळून टाकले. त्यानंतरही आपल्याच मिजाशीत माध्यमांना सामोरे गेलेल्या कोणा शिक्षिकेवर या विद्यापीठाने झाल्या प्रकाराचे खापर फोडले. ती तर निर्लज्जपणाची कमाल. पण हे असे प्रकार पुन्हा होणे टाळावयाचे असेल तर शिक्षण या संकल्पनेचा विचार अराजकीय, अधार्मिक, अभिनिवेशशून्यपणे करावा लागेल. तरच समाजाच्या गालगोटियाकरणाचे गोलमाल पुन्हा होणार नाही. नपेक्षा आणखी एक उत्सव आपल्या नावे लागला, इतकेच.