spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उपेक्षित समाजासाठी शासन “आपल्या दारी”

शतकानुशतकांच्या वंचितपणाला अखेर शासनाचा आधार

संदीप बलवीर, सोनेगाव (बोरी) १९ :  शासन दरवर्षी नवनव्या योजना राबवत असले तरी प्रमाणपत्रांच्या अभावामुळे नागपूर ग्रामीण तालुक्यातील सरोदी, पारधी, वडार, गवळी व गोसावी समाज शासकीय योजनांपासून आणि नोकरीपासून दूरच राहिला होता. मात्र सोनेगाव (बोरी) येथील सुशिक्षित सरपंच उमेश भोले यांच्या प्रयत्नांमुळे या उपेक्षित समाजासाठी आता शासन “आपल्या दारी” आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जंगल-दऱ्यात भटकंती करणाऱ्या या समाजाचे अनेक गावांत स्थायिक होऊनही त्यांच्याकडे अधिवास, जात, उत्पन्न यासारखी मूलभूत प्रमाणपत्रे नव्हती. परिणामी उच्चशिक्षित असूनही या समाजातील युवक-युवतींना सरकारी नोकरी व योजनांचा लाभ मिळू शकत नव्हता.

सरपंच उमेश भोले यांनी या समाजाच्या व्यथा वारंवार आमदार समीर मेघे यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या तळमळीमुळे अखेर आमदार मेघे यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील रामा, कवठा, दुधा, ढवळपेठ, तारसी, वाठोडा, ब्राह्मणी, जंगेश्वर व बोरखेडी (रेल्वे) गावांतील भटक्या विमुक्त जातींच्या लोकांना आवश्यक प्रमाणपत्रे देण्यासाठी तहसीलदारांना आदेश दिले.

त्यानुसार तालुक्यात विविध गावांमध्ये १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिरे घेऊन गृहचौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. लवकरच या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न दाखले वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती उमेश भोले यांनी दिली.

या निर्णयामुळे शेकडो वर्षांपासून वंचित राहिलेल्या समाजात आनंदाचे वातावरण आहे. आता शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीची नवी दारे खुली होणार असल्याचा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. शिबिरात शेकडो लोकांनी सहभाग घेतला तर तहसीलदार, नायब तहसीलदार दिनेश हटवार व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.