Ø लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप
यवतमाळ :- भारत सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा योजने’ अंतर्गत पारंपारिक कारागिरांचे सक्षमीकरण, वित्तीय समावेशन आणि थेट पतपुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने दि. २३ जुलै २०२६ रोजी राधामंगल कलर्स इन, धामणगाव रोड, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय भव्य पतपुरवठा शिबिर “पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सव” यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख अजय कुमार सिंग यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरच्या एमएसएमईचे संचालक डॉ. विजय शिरसाठ, सहाय्यक संचालक सुभाष इंगेवार, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी जीवन बोथीकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अतुल इंगळे व अमरावती सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रमुख सुनिल पांडे हे उपस्थित होते. शिबिराला विविध बँकेचे अधिकारी व इतर सरकारी विभागाचे अधिकारी सुद्धा हजर होते.

कार्यक्रमाची सुरुवात अमरावती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रमुख सुनील पांडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी या शिबिराचा मुख्य उद्देश स्पष्ट करत स्थानिक कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वचनबद्ध असल्याचे सांगितले. संचालक डॉ. विजय शिरसाठ यांनी पीएम विश्वकर्मा योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. विनातारण कर्ज, आधुनिक साधनसामग्री आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून पारंपारिक व्यवसाय कसे शाश्वत उद्योगात बदलू शकतात, हे त्यांनी पटवून दिले. नाबार्डचे डी.डी.एम. अतुल इंगळे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात एमएसएमई क्षेत्राची भूमिका स्पष्ट केली आणि उपस्थितांना संस्थात्मक पाठबळाचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख अजय कुमार सिंग यांनी बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत वित्तीय मदत जलद आणि पारदर्शकपणे पोहोचवण्याचा पुनरुच्चार केला.
पीएम विश्वकर्मा कर्ज उत्सवामध्ये ७५ कारागीर लाभार्थ्यांना एकूण ६७ लक्ष रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी बिझनेस कॉरेस्पॉन्डंट्स द्वारे विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. याद्वारे पीएम विश्वकर्मा नोंदणी, सी-केवायसी अद्ययावत करणे आणि बँकांच्या इतर विविध कर्ज योजनांची माहिती व नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
कार्यक्रमाचा समारोप मुख्य जिल्हा बँक व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, बँक अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.





