नागपूर :- तिरळे कुणबी सेवा मंडळ, नागपूर च्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बाजीराव वाकडे (पाटील) यांच्या सहाषष्ठी पूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. सेवानिवृत्त अभियंता असलेले पांडुरंग वाकडे (पाटील) यांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केले आहे. तिरळे कुणबी सेवा मंडळ, अयोध्यानगर सांस्कृतिक व समस्या निवारण समिती, आम्रपाली उत्कर्ष संघ तसेच विविध सामाजिक संस्थांमधून त्यांनी समाजसेवेचा मोठा ठसा उमटविला आहे. आशीर्वादनगर येथील तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार सुधाकर कोहळे, दीपक कापसे, राम इंगोले यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, मित्रपरिवार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी वाकडे (पाटील) यांच्या समाजसेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना वाकडे (पाटील) यांनी समाजसेवेची वाट अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव बोराडे, अनिता वाकडे, मोनाली काळे, निलेश काळे, रमेशभाऊ काकडे व महेश पेंडसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.








