यवतमाळ :- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या हिंदरत्न मनस्वी विशाल पिंपरे (वय ८ वर्षे) हिचे गौरवपूर्ण स्वागत करण्यात आले. तिच्या उल्लेखनीय क्रीडात्मक यशाबद्दल जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, तालुका क्रीडा अधिकारी आरती काळे, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, चैताली लोखंडे, सचिन हरणे, क्रीडा विभागातील कर्मचारी तसेच मनस्वीचे पालक विशाल पिंपरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनस्वीच्या पुढील क्रीडात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मनस्वी सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. ती जागतिक विक्रमवीर असून नॅशनल स्केटिंग चॅम्पियन २०२३ ते २०२५ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांची मानकरी आहे.
मनस्वी दरवर्षी आपल्या स्केटिंग रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असते. यावर्षी सुदृढ क्रीडा आणि एकात्मता हा संदेश देण्यासाठी ती २४ जानेवारी रोजी पांढरकवडा ते वणी दरम्यान सलग ५० किमी स्केटिंग रॅली करणार आहे. ही रॅली सकाळी ७ वाजता पांढरकवडा नगरपरिषद कार्यालयातून सुरू होऊन वणी येथील शिवाजी पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.
या रॅलीदरम्यान मार्गावरील विविध गावे, शाळा, महाविद्यालये व सेवाभावी संस्था मनस्वीचे स्वागत करणार आहेत. या उपक्रमातून युवा पिढीला क्रीडाकडे प्रवृत्त करणे तसेच २०३६ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर क्रीडा संस्कृती रुजविण्याचा संदेश देण्यात येणार आहे.