खापा :- मॉयल लिमिटेड, गुमगाव खाण, खापाच्या वतीने डी जी एम एस (DGMS) च्या मार्गदर्शनाखाली मॉयल लिमिटेडच्या गुमगाव खान येथे चाळीस वा (४०वा) मेटॅलिफेरस माइन सेफ्टी वीक (खान सुरक्षा सप्ताह २०२५- २६) “सुरक्षित सोच ही हमारा सुरक्षा कवच” या स्लोगन अंतर्गत दि. १८ डिसेंबर गुरूवारला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एस. आर. महतो, उपसंचालक, खान सुरक्षा (DDMS–NR-II, वेस्टर्न झोन), तरुण देवांगन, वरिष्ठ व्यवस्थापक (खान), मॉयल लिमिटेड (टीम कन्व्हिनर), सुरेश कुमार ठाकरे, वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, थुलसी रामी रेड्डी, वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड तसेच चेतन केळवडे, सहाय्यक व्यवस्थापक (मायनिंग), लॉयड्स लिमिटेड उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत खान तपासणी पार पडली. सर्व मान्यवरांचे स्वागत माइन मॅनेजर उमेश चरपे यांनी केले. त्यानंतर अब्दुल अकील शेख यांनी सादर केलेल्या सुरक्षा विषयक गीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली व उपस्थितांना सुरक्षिततेचा संदेश दिला.

या कार्यक्रमास ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी, कामगार, महिला तसेच स्थानिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक जवाहर हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नुक्कड नाटकातून खान सुरक्षेचा प्रभावी संदेश देण्यात आला. तसेच काही विद्यार्थ्यांनी खान व सामान्य सुरक्षेवर भाषणे सादर केली. स्थानिक वसाहत आणि विद्यार्थ्यांद्वारे सुरक्षा विषयक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतर गुमगाव खानच्या महिला फर्स्ट एड टीमने प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक सादर केले. बीडीसी क्षेत्रात होणाऱ्या संभाव्य अपघातांवर कसे नियंत्रण ठेवावे याचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखवून सुरक्षित कामकाजाचे महत्त्व सांगितले.
निरीक्षण पथकातील सर्व मान्यवरांनी सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले व गुमगाव खानच्या सुरक्षित कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शून्य अपघात पुरस्कार याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. विशेषतः एस. आर. महतो यांनी अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगून कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. केंद्र शासनाद्वारे कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांबद्दल माहिती देण्यात आली. सुरक्षा विषयी जागरूकता निर्माण करणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा तिवारी (भूवैज्ञानिक) व पी. वेंकटेश (सुरक्षा अधिकारी) यांनी केले. तर आभार आकाश कुमार साहू, अंडर ग्राउंड मॅनेजर, गुमगाव खान यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सुरक्षिततेने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर निरीक्षण पथकाने खदानच्या सर्व क्षेत्रांमध्ये, जसे की सर्फेस व अंडर ग्राउंड भागांमध्ये भेट देऊन सविस्तर तपासणी केली. तसेच खदानीशी संबंधित विविध रेकॉर्ड्स व कागदपत्रांची देखील तपासणी करण्यात आली.




