spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिंदी राष्ट्रीय एकात्मतेचा आधार – संजय अग्रवाल

-पदव्यूत्तर हिंदी विभागात हिंदी दिवस समारंभ

नागपूर :- राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्यात हिंदी भाषेची सर्वात मोठी भूमिका असून राष्ट्रीय एकात्मतेचा हिंदी भाषा आधार असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या आयकर विभागाचे सहआयुक्त संजय अग्रवाल यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात हिंदी दिवस समारंभ सोमवार, दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला. यावेळी अग्रवाल मार्गदर्शन करीत होते.

कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी भूषविले तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या आयकर विभागाचे सहआयुक्त संजय अग्रवाल, विशेष अतिथी म्हणून मध्यप्रदेश सरकारच्या वित्त विभागातील माजी संचालक आर. एन. मिश्र यांची उपस्थिती होती.

हिंदी ही संपर्क आणि संवादाची भाषा असल्याचे पुढे बोलताना अग्रवाल यांनी सांगितले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात भारतीय भाषांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नव्हे तर समाजाला जोडण्याचे आणि राष्ट्राला एकात्मिक करण्याचे साधन देखील असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

मध्य प्रदेश सरकार, भोपाळ येथील वित्त विभागाचे माजी संचालक आर. एन. मिश्र यांनी मार्गदर्शन करताना हिंदीचे जग सतत विस्तारत असल्याचे सांगितले. हिंदी केवळ अधिकृत भाषा म्हणूनच नव्हे तर एक सामान्य भाषा म्हणून ही समाजातील सर्व घटकांना जोडत असल्याचे मिश्र म्हणाले.

प्रास्ताविक करताना हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी संपूर्ण जगावर प्रभाव पाडणाऱ्या कल्पना आणि तंत्रज्ञान दोन शक्ती असून कल्पनांचा प्रसार आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रगतीमध्ये भाषा सर्वात मध्यवर्ती भूमिका बजावत असल्याचे सांगितले. आज हिंदी ही केवळ विचारांची भाषा नव्हे तर तंत्रज्ञानाची भाषा म्हणूनही प्रगती करत आहे. अधिकृत आणि राष्ट्रीय भाषा असण्यासोबतच, जागतिक भाषा आणि ज्ञान आणि विज्ञानाची भाषा म्हणून हिंदीचा वापर वाढत असल्याचे डॉ. पांडे म्हणाले.

या निमित्ताने हिंदी विभागात निबंध लेखन, काव्य पाठ, कविता लेखन, गीत गायन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हिंदी दिवस समारंभात पाच स्पर्धेतील प्रथम, द्वितीय तथा तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या एकूण १५ विद्यार्थ्यांना साहित्य आणि प्रमाणपत्र देत प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. लखेश्वर चन्द्रवंशी यांनी डॉ. एकादशी जैतवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठित साहित्यकार रामकृष्ण सहस्त्रबुद्धे, हेमलता मिश्र, संतोष बादल, डबली, डॉ. सुमित सिंह, प्रा. जागृति सिंह, प्रा. दामोदर द्विवेदी, प्रा. विनय उपाध्याय यांच्यासह संशोधक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.