Wednesday, March 25, 2026
spot_imgspot_img
spot_img

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ 

– जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटींचा निधी

– उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मानले आभार

यवतमाळ :- राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या अभियानांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान व नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी ए‍क कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील ‘अ’ वर्गातील यवतमाळ, ‘ब’ दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, ‘क’ वर्गातील घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर, पांढरकवडा या नगरपरिषदा व राळेगांव, कळंब, महागांव, मारेगांव, बाभुळगांव, झरी जामणी आणि ढाणकी या नगरपंचायत क्षेत्रातील मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य सुविधा, पर्यावरण व स्वच्छता तसेच पर्यटन विकासाला चालना देण्यास मदत होणार आहे.

निधीची तरतूद

राज्यातील महानगरपालिकांना प्रत्येकी ₹5 कोटी निधी देण्यात येणार असून नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी ₹1 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी विविध नागरी विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे.

निधी वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे

अभियानांतर्गत किमान 50 टक्के निधी मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित निधी आरोग्य सुविधा (आरोग्य केंद्र, साहित्य, महिलांसाठी सॅनिटरी पॅड मशीन), पर्यावरण व स्वच्छता तसेच पर्यटन विकासासाठी वापरण्यात येणार आहे. ज्या नगरपरिषद किंवा नगरपंचायतींमध्ये शाळा नाहीत, त्यांनी 50 टक्के निधी आरोग्य सुविधांसाठी वापरणे बंधनकारक राहणार आहे.

अभियानाचा कालावधी व स्पर्धा

या अभियानाचा प्रारंभिक कालावधी एक वर्षाचा असून कामगिरीच्या आधारे तो वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये विकास कामांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

पारितोषिके

या स्पर्धांमधील विजेत्यांना महानगरपालिका स्तरावर प्रथम ₹10 कोटी, द्वितीय ₹7 कोटी व तृतीय ₹5 कोटी अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर प्रथम ₹5 कोटी, द्वितीय ₹3 कोटी व तृतीय ₹2 कोटी अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

उद्दिष्ट

या अभियानाचा मुख्य उद्देश नागरी भागात मूलभूत सुविधा मजबूत करणे, मराठी शाळांची गुणवत्ता वाढवणे, महिलांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करणे तसेच पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर शहरे विकसित करणे हा आहे.

या निधीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरी भागांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे.

चौकट :

“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिक बळ मिळणार आहे. या निधीमुळे नागरी भागातील मराठी शाळांचा विकास, आरोग्य सुविधांची उपलब्धता, पर्यावरण संरक्षण व स्वच्छता आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” -पालकमंत्री ना. संजय राठोड


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com