संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदाराने मतदान करणे ही एक अत्यावश्यक बाब आहे. या दिवशी संभवत: मतदारांस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सुटी दिली जाते, यातच मतदानाचे महत्व स्पष्ट होते. मतदानाचे दिशी सकाळी उठावे, हातातले चिटकोरे घेऊन नियुक्त केंद्रात जाऊन रांग धरावी. बोट आणि मतदार ओळखपत्र पुढे करावे. योग्य ठिकाणी शाईलेपन झाले की त्या समधुर लोकशाही ध्वनी काढणाऱ्या यंत्रासमोर (आडोश्याला) उभे राहून आपल्याला हवे ते बटण दाबावे! बाहेर पडून एक सेल्फी घ्यावी, आणि ती तात्काळ समाजमाध्यमांवर पोष्टावी. झाले मतदान!
यानंतर सारे काही विसरुन जावे! इथून पुढे आपले काम संपले, असे कोणास वाटू शकेल. परंतु, तसे नाही. लोकशाहीसाठी तुम्हाला हरेक प्रभागात तीन-चार वेगवेगळी मते द्यावी लागू शकतात. हे सारे लक्षात ठेवणे अवघड आहे. यावर सोपी पद्धत अशी : सा रे ग म प…हे लक्षात ठेवा! चार मतदान यंत्रांना आपण सारेगम म्हणू. हे सारे स्वर आपल्याला उलटसुलट वाजवायचे आहेत. म्हणजे गमपरेसा असे वाजवले तरी चालेल किंवा मसापग रे असेही वाजवा…एकूण काय तर लोकशाहीची (स्वरपेटी) वाजवायची आहे…हे शिकून घ्यावे, मगच बोट उगारुन मतदानास जावे.
मतदान कसे करावे, हे सांगणे तसे सोपे असले तरी मतदान कोणास करावे, याचे उत्तर मात्र सांप्रतकाळी कठीण होऊन बसले आहे. आपल्याला हवासा उमेदवार तूर्त कोठल्या पक्षात आहे, हे आधी हुडकून काढावे लागते. कां की कालपरेंत ज्या पार्टीत होता, त्या पार्टीत तो आज असेलच असे नाही! परवापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची आय माय काढणारा उमेदवार अचानक प्रभागाच्या विकासासाठी पार्टी बदलतो. विरोधात राहून विकास होणे कठीण आहे, असे त्याला रातोरात वाटू लागते. त्याचीही काही चूक नसते. विकासच होणार नसेल तर निवडून येऊन तरी काय उपयोग? हा विचार लोकशाही व्यवस्थेत प्रगल्भच मानला पाहिजे.
उमेदवाराची कोलांटउडी समजून घेण्याजोगी आहे. व्यक्ती तशा प्रकृती. सकाळी पानात पडलेली भाजी रात्रीच्या जेवणात पुन्हा समोर आली तर आपल्यालाही नकोसे वाटते. तीच तीच पार्टी, तेच तेच तिकिट, तेच तेच नेते किती काळ सहन करावेत? पण हल्लीच्या काळात कुठल्या विचारधारेचा पक्ष कुठल्या धारेला लागला आहे, हेच मुळी कळेनासे झाले आहे. त्यात असे चार-चार येरु निवडायचे आणि त्यांना मते वाटायची, हे कर्म अवघडच म्हटले पाहिजे.
प्रभागातील मतदारांना आपला भावी नगरसेवक तसा परिचयाचा असण्याचा संभव असतो. काही नगरसेवक तर आपल्या डोळ्यांदेखत बिघडलेले मतदारांस पहावे लागते. कालपर्यंत इसम असलेली ही व्यक्ती आता नेता म्हणून स्वीकारणे कठीण जाते. पण लोकशाहीसाठी हे करायलाच हवे.
अशा वेळी मतदान कसे करावे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. ‘आपल्या घरात किती मद्दार आहेत?’ हा हळू आवाजात विचारलेला सवाल कल पालटणारा ठरु शकतो! मद्दार म्हंजे मतदार. तो ‘गद्दार’च्या चालीवर ऐकू आला की कानांस बरा वाटत नाही हे खरे, पण सध्या ही बाब कानाआड करणे किफायतशीर ठरावे!
आम्ही सुचवलेला मार्ग असा : सर्वसाधारणपणे चांगले निवडणूकचिन्ह बघावे, जमल्यास उमेदवाराचा चेहराही आवडेलसा निवडावा. बटण दाबण्याची वेळ येईल तेव्हा मनाचा कौल घ्यावा, आणि परिस्थितीला जागून बोट पुढे न्यावे. पुढचे सारे दैवाहाती सोपवावे.




