– घोरपड शिरपूर ग्रामपंचायतीचा शिक्षणहिताचा ऐतिहासिक निर्णय; शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी अनोखा उपक्रम
कामठी :- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या आणि खासगी शाळांकडे वाढता कल लक्षात घेता शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी घोरपड शिरपूर ग्रामपंचायतीने अभिनव पाऊल उचलले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या कुटुंबांचा घरकर व पाणीकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासक तारा बलवंत कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोरपड शिरपूर येथील पटसंख्या घटत असल्याने गावातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याच शाळेत शिक्षण घ्यावे, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांना थेट आर्थिक सवलत मिळणार असून घरकर आणि पाणीकर या दोन्ही करांमधून सूट मिळणार आहे. त्यामुळे गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून कौतुक होत असून, ‘गावातील मुलांनी गावातीलच शाळेत शिकावे आणि शाळा टिकली तर गावाचा शैक्षणिक विकास टिकेल’ या भूमिकेला या निर्णयातून बळ मिळाले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, मोफत व सर्वसमावेशक शिक्षणाची सुविधा उपलब्ध असताना स्थानिक पातळीवर पालकांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयोग इतर ग्रामपंचायतींसाठीही दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.
घोरपड शिरपूर ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे केवळ एका शाळेची पटसंख्या वाढण्यापुरते मर्यादित न राहता ग्रामीण शिक्षण चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








