spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रॅज्युइटी लागु करा; महिला मेळाव्यात एकमुखी मागणी

– मानधन तुटपुंजे; पेन्शन व ग्रॅज्युइटीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करणार – खासदार बर्वे

– अंगणवाडी सेविकांचा संघर्ष न्याय्य; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – श्याम काळे

कन्हान :- अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतानाही त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी पेन्शन व ग्रॅज्युइटी योजना तातडीने लागु करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी कन्हान येथे आयोजित महिला मेळाव्यात करण्यात आली.

जे एन रोड कन्हान येथील कुलदीप मंगल कार्यालयात अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) यांच्या वतीने पारशिवनी तालुका व कन्हान शहर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन रामटेक लोकसभा खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आयटकचे सचिव श्याम काळे होते. यावेळी राज्य सचिव वनिता कापसे, नागपुर जिल्हा सचिव ज्योती अंडरसा हारे, कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी, राज्य कौन्सिल सदस्य सुनिता मानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने झाली. तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मेळाव्यात बोलताना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अंगणवाडी सेविकांची भूमिका समाजासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, त्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युइटीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.राज्य सचिव वनिता कापसे यांनी महिलांनी संघटित राहुन लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. जिल्हा सचिव ज्योती अंडरसाहारे यांनी पोषण ट्रॅकर प्रभावीपणे भर ण्याबाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी यांनी अंगणवाडी सेविकांच्या पेन्शन व ग्रॅज्युइटी संदर्भात नगरपरिष देत ठराव मंजुर करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात श्याम काळे यांनी कर्नाटक व गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याने शासनाने विलंब न करता ग्रॅज्युइटी लागु करावी, अशी मागणी केली. “आम्ही खोटे बोलत नाही, खोटे काम करत नाही. कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात स्वर्गीय इंदु वामनराव पाहुणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन सुनिता मानकर यांनी तर आभार प्रमिला वैद्यकार यांनी मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मेळाव्यास पारशिवनी तालुका सचिव उषा सहारे, कन्हान शहर अध्यक्षा अश्विनी वाघमारे, समाजसेविका रीता बर्वे, माला खोब्रागडे, राधिका चव्हाण, बेबी ढोरे, नलु बरडे, गौरा राऊत, उषा चौरीवार, दुर्गा मोटघरे, माया कठाळे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस व महिला उपस्थित होत्या.

Popular Articles