– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन; बेला येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
बेला (जि. नागपूर) :- शेतकऱ्यांनी ‘पीक पॅटर्न’मध्ये बदल करून बाजारपेठेच्या मागणी आणि उत्पादकता यामधील सुवर्णमध्य साधत उत्पन्नवाढ साधावी. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालावेत यासाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवडीस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने बेला येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ना. गडकरी म्हणाले, ‘शेतकरी इंधनदाता व्हावा यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. भारताला संपन्न बनवायचे असेल, तर ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. या परिवर्तनाचा केंद्रबिंदू शेतकरीच आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले, तर देशाचे अर्थकारण मजबूत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन आणि मूल्यवृद्धी या दोन्ही दिशांनी पुढे जायला हवे.’

ते पुढे म्हणाले, ‘कारखाना सुरु करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या सहकार्याने आणि चिकाटीने आपण त्या सर्व अडचणींवर मात केली. आज कारखाना यशस्वीपणे चालत आहे आणि त्याचे श्रेय शेतकऱ्यांनाच जाते. भविष्यातही हाच सहकार कायम राहिला पाहिजे.”
‘ऊसाबरोबरच इतर पिकांच्या संदर्भातही ‘ऍग्रो व्हिजन’च्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळा आणि जागरुकता कार्यक्रम राबवत आहोत. विदर्भातील शेतकऱ्यांनी या कृषी चळवळीत सहभागी होऊन आपला प्रदेश कृषी समृद्ध बनवावा,’ असे आवाहनही गडकरी यांनी केले.
याप्रसंगी ना.गडकरी यांच्या हस्ते कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवणाऱ्या नामांकित शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मानस समूहाचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा होते. तर आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, आनंदराव राऊत, अनिल मेंढे, नरेंद्र जीवतोडे, प्रबंध संचालक समय बनसोड, संचालक फकिरा खडसे, शेषराव भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जयकुमार वर्मा यांनी केले, संचालन महाव्यवस्थापक जयंत ढगे यांनी केले तर आभार नरेश गेडेकर यांनी मानले.




