Monday, April 13, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

२४ गोवंशाची अमानवीय रित्या वाहतूक; तुमसर पोलिसांकडून ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची श्रीराम नगर खापा येथे कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा तुमसर :- जनावरांना अत्यंत निर्दयतेने आणि क्रूरपणे डांबून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा तुमसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीराम नगर खापा परिसरात छापा टाकून २४ गोवंशाची सुटका केली असून, या कारवाईत आयशर ट्रकसह एकूण ३१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशिम आणि तुमसर येथील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे आपल्या ताफ्यासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून श्रीराम नगर खापा येथे जनावरांची क्रूर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी धाड टाकली असता, आरोपींनी एका आयशर ट्रकमध्ये २४ बैल अत्यंत अमानवीय पद्धतीने कोंबल्याचे दिसून आले. जनावरांना हालचाल करता येऊ नये म्हणून त्यांना आखूड दोरखंडाने वाहनाच्या जमिनीवर बांधून ठेवण्यात आले होते. या जनावरांसाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती, ज्यामुळे त्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या.

या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे एकूण २४ बैल (किंमत ७ लाख २० हजार रुपये) आणि २४ लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा ट्रक (क्रमांक एम.एच-३०/बी.डी.-६५९७) असा एकूण ३१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी शक्ती बादल शेळके (३५), संदीप श्रीराम पाटील (४०), गणेश नारायण चौधरी (३५) सर्व राहणार जिल्हा वाशिम आणि भरत धोंडू ठक्कर (१९) राहणार तुमसर या चौघांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध अप. क्र. ५३४/२०२६ अन्वये प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११(१)(घ), (च), (झ), (ज) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com