तिरोडा १२ – तिरोडा–तुमसर मार्गावरील येडमाकोट फाट्याजवळ भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत ट्रिपल सीट जात असलेल्या मोटारसायकलस्वार आजी-आजोबा आणि नातीन गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान आजोबा आणि नातीनचा मृत्यू झाला असून आजीची प्रकृती चिंताजनक आहे. ही दुर्घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण दमाहे (रा. येडमाकोट) मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एपी ३४५१ वर पत्नी कोल्हाबाई दमाहे आणि नातीन सोनी भरत बन्नाटे (वय २०) यांच्यासह मुंडीकोटा येथे जात होते. यावेळी तिरोडाहून अकोल्याकडे वेगाने येत असलेल्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिन्ही जण रस्त्याखाली फेकले गेले व गंभीर जखमी झाले.
जखमींना प्रथम तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले. रात्री उपचारादरम्यान लक्ष्मण दमाहे यांचा मृत्यू झाला, तर सकाळी सुमारे ९ वाजता नागपूर येथील रुग्णालयात सोनीचा मृत्यू झाला. कोल्हाबाई दमाहे यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता आणि काही वेळ वाहतूक कोंडी झाली. तिरोडा पोलिस स्टेशनचे शिपाई विदेश अंबुले, प्रणव तिवारी, वाहतूक पोलीस विनोद चवळे, महिला शिपाई नयना तसेच स्थानिक नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.








