रामटेक १२ : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या एका पत्रकाराला बातमी छापल्याच्या रागातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘पत्रकाराचा जीव गेल्यावरच पोलीस गुन्हा दाखल करणार का?’ असा संतप्त सवाल विचारत पत्रकार संघटनांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पत्रकारांच्या हत्येचे प्रकार ताजे असताना पोलिसांची निष्क्रियता!
देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या हत्यांचे प्रकार ताजे आहेत. गेल्या काही महिन्यांत ओडिशातील पत्रकार सीएच नरेश कुमार यांची १२ जुलै रोजी, छत्तीसगढमधील मुकेश चंद्रकार यांची ३ जानेवारी रोजी आणि उत्तर प्रदेशमधील राघवेंद्र वाजपेयी यांची ८ मार्च रोजी हत्या झाली होती. यापैकी काही प्रकरणांमध्ये पत्रकारांना आधी धमक्या मिळाल्याचेही समोर आले होते. अशा परिस्थितीतही रामटेक पोलिसांनी तक्रार दाखल करूनही कारवाई न केल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पत्रकार संघटना आक्रमक!
रामटेक येथील ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेचे सदस्य, पत्रकार सुरेंद्र बालचंद बिरणवार यांनी ३ ऑगस्ट रोजी एका वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी छापल्यामुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत श्याम वाघमारे (रा. नगरधन) आणि नीलेश वाघमारे (रा. हमलापुरी) यांनी बिरणवार यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पत्रकार बिरणवार यांनी १० ऑगस्ट रोजी रामटेक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. मात्र, तक्रारीला तीन दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांना अटकही केली नाही.
या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना आणि व्हाईस ऑफ मीडिया, रामटेक शाखेने सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक यांना सामूहिक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ‘पत्रकार संरक्षण कायदा २०१९’ च्या कलम ३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
तीन दिवसांत अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पोलिसांनी पुढील तीन दिवसांत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याने, जिल्ह्यातील पत्रकार संघटना उद्या, मंगळवारी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांची भेट घेऊन तक्रार देणार आहेत. किमान पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर तरी कारवाईला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जनहिताचे काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जर पत्रकारांनाच अशा धमक्या मिळत असतील आणि पोलीस कारवाई करत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.




