Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; २५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा करडी :- करडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर पोलिसांनी धडक कारवाई केली असून, एकूण २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई देव्हाडा बुर्ज येथील वैनगंगा नदी पुलाजवळ करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, करडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत, पोलीस उपनिरीक्षक फरताडे आणि त्यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना तिरोड्याकडून एक अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर (क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ३८६३) येताना दिसला. संशयावरून पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली.

टिप्पर चालक तथा मालक जयकिशोर प्रेमलाल ठाकरे (३५, रा. खैरलांजी, ता. तुमसर, जि. भंडारा) याला रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाही. विनापरवाना रेतीची चोरी करून शासनाचा महसूल बुडवणे आणि पर्यावरणाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड टिप्पर आणि २४ हजार रुपये किमतीची ४ ब्रास रेती, असा एकूण २५,२४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ४७, ४८ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम १५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे (अपराध क्र. १००/२०२६).

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई तांगडे व करडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. घटनेचा पुढील तपास करडी पोलीस करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com