– २०२०-२५ दरम्यानच्या आय इ सी निधीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप
पांढरकवडा :- येथील नगर परिषदेत ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आलेल्या आय इ सी निधीचा विनियोग न करता, केवळ कागदोपत्री बोगस कामे दाखवून लाखो रुपये हडप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बाबाराव पडोळे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
शासनाकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी, भिंतीवर चित्रकला (वॉल पेंटिंग), होर्डिंग्ज लावणे, पथनाट्ये सादर करणे आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. तक्रारदार योगेश पडोळे यांच्या दाव्यानुसार, २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत शहरात काही मुख्य चौकांत जुजबी भिंतीचित्रे काढून ‘काम केले’ असा देखावा निर्माण केला जातो. मात्र, या मोजक्या कामांच्या आडोशाने लाखांची बिले लाटली जाते मात्र, कागदोपत्री सर्व कामे पूर्ण झाल्याचे दाखवून कंत्राटदारांची देयके काढण्यात आली आहेत.
शहरात कुठेही नवीन वॉल पेंटिंग किंवा स्वच्छतेचे संदेश देणारे फलक प्रत्यक्षात दिसत नसताना, केवळ कागदोपत्री भिंती रंगवल्याचे दाखवण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कामे न करता केवळ बोगस देयके सादर करून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात निविदा प्रक्रियेत पारदर्शकता धाब्यावर बसवण्यात आली असून, ठराविक एजन्सीला फायदा पोहोचवण्यासाठी अधिकार आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत होऊन ‘टेंडर मॅनेज’ करण्यात आले विशेष म्हणजे, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पथनाट्यांचा आणि उपक्रमांचा पत्ताच नाही, ज्यामुळे शासनाचा मूळ उद्देश तर बाजूलाच राहिला, पण जनतेच्या कराचा पैसा मात्र लाटण्यात आला आहे.
या प्रकरणात सहभागी असलेले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी योगेश पडोळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी माहिती अधिकारांतर्गत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, दोषींकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याची मागणीही लावून धरली आहे.
आता या तक्रारीनंतर प्रशासन काय भूमिका घेते आणि या ‘कागदोपत्री जनजागृती’मागचे खरे चेहरे समोर येतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शहराच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी येणारा निधी काही भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या खिशात जात असेल, तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
– योगेश पडोळे, तक्रारदार, पांढरकवडा




