spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होऊ या गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांची बैठकीत आवाहन

 

 नागपूर, ता. १३  : काही दिवसांनी शहरात साजरा होणारा गणेशोत्सव सामाजिक जबाबदारी ओळखून तसेच प्रदूषणाचा विळखा दूर राखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत केले.

नागपूर महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी (ता. १२) कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. यावेळी सहपोलीस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त  शिवाजी राठोड,  वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त  निकेतन कदम, उपायुक्त  शशीकांत सातव, अप्पर जिल्हाधिकारी  प्रवीण महिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

येत्या २७ ऑगस्टपासून शहरात गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हा गणेशोत्सवात विविध विभागांच्या परवानग्या  घेण्यासाठी तसेच सामाजिक  सलोखा राखण्याकरिता घ्यावयाची काळजी, देखाव्यातून सामाजिक जनजागृती निर्माण करणे, विसर्जनाच्या संदर्भात पोलिसांना आगाऊ माहिती देणे, विसर्जनाची मिरवणूक काढताना डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणे, मिरवणूक काढताना असभ्य गाणे वाजविण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून काळजी घेतल्यास शहरातील गणेशोत्सव हा देशातील एक आगळेवेगळे स्थान निर्माण होईल, असे आवाहन मान्यवरांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी परवानगी घेण्याकरिता कोणताही त्रास किंवा अडचण भासणार नाही, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात असून, याला शहरातील गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त  मिलिंद मेश्राम यांनी दिली. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर क्लिक केल्यास गणेश मंडळांची नोंदणी तसेच इतर ना हरकत प्रमाणपत्रे एकाचवेळी उपलब्ध होणार आहे. गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना पुन्हा नोंदणी  करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना केवळ विविध खात्यांच्या परवानग्या घ्याव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक टप्प्यानुसार ऑनलाईन  नोंदणीची प्रक्रिया समजावून दिली.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा आग्रह

 महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. गेल्यावर्षी नागपुरातील ९८ टक्के सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या श्रीगणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले. गणेशोत्सव मंडळांना नोंदणी किंवा ना हरकत प्रमाणपत्रे घेण्यासाठी त्वरित मिळावे, यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. याशिवाय ऑफलाईन पद्धतीसाठी शहरातील  प्रत्येक झोनमध्ये सुद्धा एक खिडकी योजना सुरू केली आहे. या ठिकाणी एकाच ठिकाणी पदाधिकार्यांनी सर्व विभागांच्या परवानग्या देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. चार फूट उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी तसेच ४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी वेगवेगळ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. यावेळी गोरेवाडा येथे सुद्धा कृत्रिम तलावाची व्यवस्था राहणार असून, येथे ४ फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार असल्याची  माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

सामाजिक संदेश द्या – डॉ. रविंद्र कुमार सिंगल

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त  रविंद्र सिंगल यांनी केले. गणेश मंडळाचे पावित्र्य जपण्यासाठी पदाधिकार्यांनी पुढाकार घ्यावा व पोलिसांना सहकार्य करावे. तसेच सामजिक संदेश देणारे देखावे करण्यावर गणेश मंडळांनी भर द्यावा. पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणाऱ्या देखावे तयार करणाऱ्या सर्वोत्कृष्ट मंडळांचा सत्कार करण्याची घोषणा डॉ. सिंगल यांनी केली.

यावेळी पदाधिकार्यांना काही प्रश्न विचारले तसेच काही सूचना केल्या. या सूचनांचे निराकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस आयुक्त  अनिता मोरे यांनी केले तर आभार अतिरिक्त पोलीस आयुक्त  संजय दाभाडे यांनी मानले.

बैठकीत केलेल्या महत्वपूर्ण सूचना

१. गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध, प्रत्येक झोनमध्ये गणेश मंडळांना नोंदणी व इतर ना हरकत प्रमाणपत्रे घेता येईल.

२. चॅटबॉटच्या माध्यमातून ७३९७८०७३९७ या क्रमांकावर व्हाट्सअॅप केल्यास नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

३.   पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देण्यात यावे.

४. गेल्यावर्षी नोंदणी केलेल्या गणेश मंडळांना यावर्षी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ना हरकत प्रमाणपत्रे घेणे आवश्यक.

५. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मिरवणुकीची परवानगी आगाऊ घेण्यात यावी.

६. डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे. असभ्यगाणे व नृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल

७.विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.

८. शहरात ४०० पेक्षा अधिक कृत्रिम तलाव विसर्जनासाठी उपलब्ध राहतील.

९ . गणेश मंडळांसाठी महानगरपालिकेने सर्व शुल्क माफ केले आहे.

१०. डीजे पेक्षा पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात यावा.

११. निर्माल्य संकलनासाठी मनपाद्वारे निर्माल्य रथाची व्यवस्था राहील.

१२ . गरीब विद्यार्थ्याना मदत करणे, रक्तदान, निराधारांना मदत, पुस्तकांचे वाटप असे उपक्रम गणेश मंडळांनी राबवावे.

१३ . नशामुक्तीसाठी गणेश मंडळांनी जनजागृती करावी.

१४  . विसर्जनाच्या मिरवणुकीत लेझरचा वापर टाळावा.

१५. मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था पोलीस लाईन टाकली, गोरेवाडा आणि कोराडी येथील कृत्रिम टँक येथे करण्यात आली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.