– जनावरांची अवैध आणि क्रूर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ३५ लाखांचा आयसर ट्रक जप्त
हंसराज, प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- भंडारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जनावरांची अवैध वाहतूक आणि त्यांच्यावर होणाऱ्या क्रूरतेविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राणी अवंतीबाई चौक, माडेसर येथे बुधवारी (दि. २१) पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत २१ बैलांची सुटका करण्यात आली असून, एकूण ३८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका टाटा आयसर ट्रक (क्रमांक MH 40 CT 2798) मधून जनावरांची अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पहाटे ३:१५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून हा ट्रक अडवला. तपासणी केली असता, ट्रकमध्ये जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
याप्रकरणी ट्रक चालक मिशकात आलम नाहेम्मद महमुद (वय ४३ वर्ष) आणि क्लिनर सय्यद उस्मान सय्यद सुभान (वय ३२ वर्ष), दोघेही राहणार कामठी, जि. नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत ३५ लाख रुपये किमतीचा टाटा आयसर ट्रक आणि ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे एकूण २१ बैल (विविध रंगाचे) असा एकूण ३८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम ११ (१)( घ) (ड) (ज) (झ) प्राणी कृरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा सहकलम ५(अ ) ९ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमान्वये (अप.क्र. १४/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.