– यूपीएससीसाठी ४०० तर एमपीएससीसाठी तब्बल १,००० प्रशिक्षण जागांची वाढ
ओबीसी तसेच वंचित व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळणे ही शासनाची ठाम व स्पष्ट भूमिका असून, केवळ आर्थिक अडचणींमुळे एकही गुणवंत विद्यार्थी मागे राहू नये, या सामाजिक न्यायाधिष्ठित भूमिकेतून राज्य शासनाने एक दूरगामी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकांतील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी, या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती–भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या घटकांतील केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीसाठी ४०० तर एमपीएससीसाठी तब्बल १,००० प्रशिक्षण जागा वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री तसेच ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
अतुल सावे यांनी सांगितले की, ‘महाज्योती’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत यापूर्वी यूपीएससीसाठी केवळ १०० तर एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होती. मात्र राज्यभरातून ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्पर्धा परीक्षांबाबतची शैक्षणिक जागरूकता तसेच स्पर्धात्मक तयारीचा स्तर लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी ‘महाज्योती’कडील प्रशिक्षणासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांकडून शासनाकडे सातत्याने निवेदने सादर करण्यात आली होती. याशिवाय महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनीही प्रशिक्षणाच्या जागा वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या सर्व मागण्यांचा सखोल अभ्यास करून ‘महाज्योती’ प्रशासनाने प्रशिक्षण जागावाढीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. यासंदर्भात २० जानेवारी २०२६ रोजी महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बहुजन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण जागावाढीचा निर्णय अंतिम करण्यात आला. ‘महाज्योती’च्या माध्यमातून प्रशिक्षण क्षमतेत वाढ करण्यास औपचारिक मान्यता देण्यात आली आहे.
बहुजन विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय संधींचा विस्तार
या निर्णयामुळे सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. दर्जेदार मार्गदर्शन, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, अभ्यासासाठी पूरक वातावरण आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक शिस्त यामुळे बहुजन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होणार आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना अतुल सावे यांनी स्पष्ट केले की, राज्यभरातील बहुजन विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक न्यायाची खरी प्राप्ती म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देणे होय आणि महाज्योती त्याच दिशेने सातत्याने कार्य करीत आहे. आर्थिक परिस्थिती ही गुणवत्तेच्या आड येऊ नये, यासाठी शासनाने प्रशिक्षण क्षमतेत वाढ केली आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, तो बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल ठरत आहे. यूपीएससी आणि एमपीएससीसारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण वाढविण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरेल, असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे.