– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महावितरण कंपनीला ८ दिवसांचा अल्टिमेट !
– संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार स्थानिक स्तरावर चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता ५ जानेवारी रोजी उप विभागीय अधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालय मोर्शी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महावितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात शेती पंपांना वीजपुरवठा केला जातो. यात सातत्याने वीजपुरवठ्याच्या वेळा बदलल्या जातात. बारा महिन्यात बारा नवीन वेळांचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाते. दिवसातून केवळ आठच तास शेतीपंपांना वीज दिली जाते. त्यातही विजेचा लपंडाव सुरु असतो. कधी दिवसा, तर कधी रात्री वीजपुरवठा केला जात असून, महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. शेतीसाठी रात्रीचा केला जाणारा वीज पुरवठा बंद करून शेतकऱ्यांना दिवसा एकच वेळ निश्चित करुन पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये कार्यकारी अभियंता यांना केली.


महावितरणकडून कृषी विद्युत पंपांसाठी निर्धारीत वेळेतच वीजपुरवठा केला जातो. बहुतांशी ठिकाणी सोमवार ते गुरुवार या चार दिवशी दिवसा, तर शुक्रवार ते रविवार या तीन दिवस रात्री प्रत्येकी आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यातही अनेकदा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने जेमतेम चार ते पाच तास वीज मिळते. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार सलग आठ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा कधीच केला जात नाही. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. नियमित व पुरेसा वीजपुरवठा होत नसल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील संत्रा उत्पन्नावरही त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे रुपेश वाळके यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा कार्यकारी अभियंता यांनी वेळापत्रकामध्ये बदल करून दिवसा वीज पुरवठा करणे शक्य नसल्याचे सांगितल्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कंपनी विरोधात रोष व्यक्त करून ८ दिवसामध्ये दिवसा वीज पुरवठा न मिळण्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. यावेळी बैठकीला उप विभागीय अधिकारी रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता कासट, उप कार्यकारी अभियंता उमाळे, तहसीलदार सागर ढवळे, वन परिक्षेत्र अधिकारी चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल भोजने, निलेश कडू, मनीष गुडधे, सोमेश्वर काळे, सतीश गतफणे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.








