नागपूर १८ : खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात रविवारी (दि. १७ ऑगस्ट) दुपारी २:१५ वाजता मोठी दुर्घटना घडली. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पात अचानक फ्लॅश ओव्हर झाल्याने दोन कर्मचारी गंभीर भाजले आहेत. प्राप्त माहितीनुसार, एमसीसी रूमजवळील एफ.डी. फॅन ब्रेकरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना ६.६ केव्ही लाईनवरील ब्रेकर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक जोरदार फ्लॅश ओव्हर झाला. या अपघातात देवाजी कुबडे कन्स्ट्रक्शनमधील कंत्राटी कामगार सचिन भगत व महाजनकोचे नियमित कर्मचारी वैभव सोनुले हे दोघे गंभीर भाजले. अपघातानंतर दोघांना तात्काळ नागपूर येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर खोल जखमा असून ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. या दुर्घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांमध्ये झालेल्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा साधने व प्रक्रियांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित विभागाकडून तपास सुरू असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.








