– कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन
नागपूर :- इयत्ता १२ वी वर्गापर्यंत मराठी भाषा अनिवार्य व सक्तीची असावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सावंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल,सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य विश्वास पाटील, ख्यातनाम कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.वसंत आबाजी डहाके, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
डॉ. रवींद्र शोभणे यांना कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील संत साहित्याचा, महापुरुषांचा, समाजसुधारकांचा, धोर साहित्यिकांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, मराठी भाषेचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी शालेय स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. परंतु इयत्ता ११वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकण्यापासून दूर ठेवले जात आहे, आर्थिक लोभापायी आय.टी. सारखा विनानुदानित तत्वावरील विषय हा मराठी विषयाला पर्याय देण्यात आला आहे. या विषयासाठी विद्यार्थ्यांना जास्तीची फी आकारून कमी पगारात आय.टी. शिक्षकांची नियुक्ती केले जात आहे. संस्थापातळीवर विद्यार्थ्यांना आय.टी. विषय घेण्यास सक्तीने भाग पाडले जात आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयात तर मराठी विषय शिकविलाच जात नाही ही वस्तुस्थिती आहे.
यासाठी इयत्ता १२वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा. ज मराठी विषयाला कोणताही विकल्प नसावा म्हणून शासनाला सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नाही ही खेदाची बाब आहे. ” सातारा या ठिकाणी संपन्न होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण सर्व साहित्यिकांनी मिळून एकमताने केवळ इयत्ता १० वी पर्यंत नव्हे तर इयत्ता १२ वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याची अंमलबजावणी व्हावी म्हणून ठराव पास करावा “,ही महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर जिल्ह्याच्यातर्फे मागणी करण्यात आली. चर्चेदरम्यान शिष्टमंडळात प्रा. सुरेश नखाते, प्रा.सपन नेहरोत्रा, प्रा. संजय तिजारे, प्रा.नीता खोत ,डॉ.शालिनी तेलरांधे, प्रा.सायली पिडळी,प्रा.नरेश तम्मेवार, प्रा. प्र.ज.गोंडे, प्रा.भगवंत शोभणे आदी उपस्थित होते.




