– महापौर निता ठाकरे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन
– बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव
नागपूर :- नागपूर महानगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी वाटचाल करीत मनपाचा तसेच शहराचा नावलौकिक वाढवावा, असे मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा, प्र.अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी सीमा खोब्रागडे, सुभाष उपासे, प्रशांत टेंभूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षक आणि पालकांचा वाटा मोलाचा आहे. पालकांनी खाजगी शाळांऐवजी मनपाच्या शाळांवर विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांनी पालकांचे आभार मानले. तसेच, मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक चांगल्या आणि आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तर शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, आज सत्कार करण्यात आलेल्या ११ गुणवंत विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थिनी आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. यामुळे ‘सक्षम महिला, सक्षम देश’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा सत्कारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची आणि प्रगतीची भावना निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळते, असेही त्या म्हणाल्या. तसेच पुढील शिक्षणासाठी विद्यार्थांनी आवडत्या विषयाची निवड करताना शिक्षक व पालकांशी चर्चा करून आवडीनुसार विषयाची निवडावा असे आवाहन केले. सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी देखील विद्यार्थांचे कौतुक करीत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी माधुरी काटकर यांनी बारावीच्या परीक्षेत मनपाच्या चारही कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकालाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासे तर आभार टेंभूर्णे यांनी व्यक्त केले.
विविध शाखांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खालील विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
विज्ञान शाखा: श्वेता कोरे, सृष्टी आदमणे, शिफा परवीन मो. नजीर अहमद.
वाणिज्य शाखा: अल्फिया परवीन, सानिया कौसर, तसमिया परवीन.
कला शाखा: हूरेन कौसर, मुसना बानो, कैफियत नौशीन.
मागासवर्गीय: प्रतीक्षा सोनकुवर आणि देवांश खांडेकर.
गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक
शाळांत परीक्षेत उत्तीर्ण होत प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता मनपाद्वारे त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रथम येणाऱ्या विद्यार्थांना सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमात प्रविण्याप्रप्त विद्यार्थांना मा.महापौर यांच्याहस्ते पारितोषिक वितरण केल्या जाणार आहे.