– गोबरवाही पोलिसांची कारवाई; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोबरवाही :- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखला माईन्स (प्रतिबंधित क्षेत्र-बी) परिसरात मॅग्नीजची चोरी करून वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेली एक टाटा सुमो गाडी सुरक्षा रक्षकांनी पकडली. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी चालक गाडी सोडून पसार झाला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश परसराम गाडगे (५८, रा. रामटेक, जि. नागपूर) हे चिखला माईन्स येथे नोकरीला असून २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास ते आपल्या सुरक्षा पथकासह सितासावंगी परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात पेट्रोलिंग करीत होते. गस्तीवर असताना त्यांना एक जुनी, विना क्रमांकाची सिल्वर रंगाची टाटा सुमो संशयास्पद स्थितीत उभी दिसली.
सुरक्षा रक्षक जवळ येत असल्याचे पाहून टाटा सुमोचा चालक अंधाराचा फायदा घेऊन गाडी घटनास्थळावरच सोडून पळून गेला. गाडीची झडती घेतली असता, त्यात बेकायदेशीरपणे भरलेले मॅग्नीज (काळा दगड) मिळून आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
🔹 एक जुनी सिल्वर रंगाची विना क्रमांकाची टाटा सुमो – किंमत ५०,०००/- रुपये.
🔹 २५०० किलो मॅग्नीज (५० रुपये प्रति किलो प्रमाणे) – किंमत १,२५,०००/- रुपये.
एकूण मुद्देमाल: १,७५,०००/- रुपये.
फिर्यादी प्रकाश गाडगे यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी अज्ञात चालक/मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) सहकलम ५०/१७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा (अप.क्र. २४/२०२६) नोंदवला आहे. ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार खोब्रागडे (बक्कल नं.११४१) करीत आहेत.