चंद्रपूर शहराच्या विकासासाठी निधीवाढीची महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
27

चंद्रपूर :- चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर संगिता राजेंद्र खांडेकर यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची भेट घेऊन आयुक्त  अकुनुरी नरेश, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी संदीप गिरे, उपमहापौर प्रशांत दानव, सभागृह नेत्या जयश्री महेंद्र जुमडे तसेच सुनिता राधेश्याम जयस्वाल यांच्या उपस्थितीत विविध विकास योजनांअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीत वाढ करण्याबाबतचे निवेदन सादर केले.

सन 2026-27 या आर्थिक वर्षात चंद्रपूर महानगरपालिकेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत ₹5.89 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत ₹7.50 कोटी तसेच नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत ₹15.00 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, मागील पाच वर्षांतील निधी वितरणाची सरासरी, शहराची वाढती लोकसंख्या, नागरी सुविधा व विकासकामांची गरज लक्षात घेता सदर निधी अपुरा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

महापौरांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने व नागरिकांच्या हिताचा विचार करून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी किमान ₹11.00 कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेस ₹11.00 कोटी तसेच नागरी वस्ती सुधार योजनेस ₹1.50 कोटी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

या वाढीव निधीमुळे शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, दलित वस्ती विकास, मूलभूत नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांना चालना मिळून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.