भंडारा २० : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आसोला गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रसूतीनंतर एका बाळाचा आणि त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ग्रामीण रुग्णालयातील अत्यावश्यक सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रीना शहारे (रहिवासी आसोला) यांना सोमवारी रात्री लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. सकाळीच त्यांची प्रसूती झाली, मात्र बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रसूतीनंतर रीना यांना अतिरक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तातडीने भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
रीना शहारे यांना एक मुलगा असून, याआधी देखील दुसऱ्या प्रसूतीत बाळ गमावल्याचे समजते. तिसऱ्या वेळी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पती विनायक शहारे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पत्नी आणि नवजात बाळाच्या मृत्यूने कुटुंब हतबल झाले आहे.
सहा महिन्यांत तिसरी घटना
लाखांदूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात मागील सहा महिन्यांत प्रसूतीनंतर तीन बाळंतीणी व गर्भवती महिलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सरांडी बुज, चिचगाव आणि आता आसोला — सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
डॉक्टरांचे स्पष्टीकरण
लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी सांगितले की,
“रीना यांची प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे परिस्थिती गंभीर झाली. रुग्णालयात एनआयसीयू, लहान मुलांचे अतिदक्षतागृह, भूलतज्ज्ञ यांसारख्या अत्यावश्यक सुविधा नाहीत, त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. मात्र, प्रवासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.”
योजना कागदावरच?
जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष यांसारख्या मातृ-शिशु आरोग्य योजनांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरीही ग्रामीण भागात सुविधा पोहोचत नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बोरकर म्हणाल्या,
“सरकारकडून मातृत्व संरक्षणासाठी विविध योजना राबवल्या जातात, पण लाखांदूरसारख्या तालुक्यातील स्थिती पाहिली तर या योजना केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होते.”
ही घटना ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था उघड करणारी असून, याबाबत उच्चस्तरीय चौकशीसह जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.








