spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नियमित लसीकरणापासून माता व बालक वंचित राहू नये; राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 प्रभावीपणे राबवा

– अतिरिक्त आयुक्त अंकीत यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालये तसेच शासकीय व खाजगी दवाखान्यांमध्ये नियमित लसीकरणापासून कोणतीही माता व बालक वंचित राहू नये, तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अंकीत (शहर)यांनी दिले.

नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समिती व राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 संदर्भातील आढावा बैठक बुधवारी (दि. 20) मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त अंकीत (शहर)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांच्यापर्यंत विशेष प्रयत्नांद्वारे पोहोचून वेळेत लसीकरण पूर्ण करण्यात यावे, तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 चे ‘ॲक्शन प्लॅन’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश अंकीत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनमधील नियमित लसीकरणाची सद्यस्थिती मांडण्यात आली. नवजात बालकांपासून ते गर्भवती मातांपर्यंत विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येत असून, कोणतीही माता किंवा बालक या सेवांपासून वंचित राहू नये यावर विशेष भर देण्यात आला. प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी यासंदर्भात माहिती दिली.

यासोबतच नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या १४ वर्षे पूर्ण झालेल्या (मात्र १५ वा वाढदिवस न झालेल्या) मुलींना HPV लसीकरणाचा लाभ अधिकाधिक प्रमाणात मिळावा यासाठी वंचित बालकांपर्यंत पोहोचून लसीकरण मोहिमेला गती द्यावी. तसेच नियमित लसीकरणासाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ तयार करण्यात आले असून, झोननिहाय खाजगी डॉक्टरांच्या बैठका आयोजित करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त अंकीत यांनी दिले.

तसेच नोडल अधिकारी डॉ. मेघा जैतवार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 चा ॲक्शन प्लॅन सादर केला. शहरात एकूण 2,00,216 पोलिओ लाभार्थी असल्याची व राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ‘मोबाईल टीम’ व ‘ट्रान्झिट टीम’ नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यासोबतच सन २०२६-२७ मध्ये दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्यातील सर्व जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मोहिमेच्या दिवशी बूथवर तसेच त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरभेटी घेऊन ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण, नियमित AFP सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशाला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, ही स्थिती कायम राखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी आरोग्य विभागामार्फत मायक्रो प्लॅनिंग, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम तसेच उच्च जोखीम भागांमध्ये विशेष सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी आपल्या परिसरातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.

यासाठी रोटरी क्लब व आयएमए (IMA) यांसारख्या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात येणार असून, जनजागृती व मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी त्या मदत करणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मोहिमेसाठी 100 वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या वाहनांच्या सहाय्याने पोलिओ बूथवर कर्मचारी व स्वयंसेवकांची ने-आण, अल्पोपहाराची व्यवस्था तसेच पोलिओ संदर्भातील व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

संपूर्ण शहरातील नवजात बालकांचे जन्मानंतरच्या पहिल्या दिवसांपासून सर्व नियमित लसीकरण वेळेवर, योग्य पद्धतीने व शंभर टक्के पूर्ण व्हावे, यासाठी झोनस्तरावर प्रभावी नियोजन व कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक झोनसाठी ‘झोन मेडिकल ऑफिसर’ (ZMO) यांची नियुक्ती करून पोलिओ संदर्भातील विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त अंकीत यांनी झोन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाळसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड,रोटरी क्लब चे शशांक विश्वरूपे, IMA चे सचिव डॉ. अंजली भांडारकर,साथरोग अधिकारी डॉ गोवर्धन नवखरे, राष्ट्रीय पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. मेघा जैतवार,हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ मंजुषा मठपती, एन.यू.एच.एम.चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम,एमएसयुचे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र वानखेडे, पी.एच.एन. अर्चना खाडे,  दिपाली गणोरकर,ज्योती मानकर, प्रफुल्ल किन्हीकर, तसेच झोनल वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles