– मौजा-नारी येथे मनपा उभारणार 518 सदनिका
नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकरिता मौजा-नारी भागात उभारण्यात येणाऱ्या 518 सदनिका घरकुल योजनेच्या ‘ स्वप्नपूर्ती’ घरकुल प्रकल्पाची पाहणी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शनिवारी (ता.11) केली.
यावेळी नगरसेवक दिनेश यादव, मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त गणेश राठोड, , कार्यकारी अभियंता सुनील ऊइके, वन संवर्धक अमोल चौरपगार, झोनल स्वच्छता अधिकारी भोला खोब्रागडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व आयुक्त डॉ. विपीन यांच्या देखरेखीत नागरिकांना परवडणाऱ्या घरे योजनेअंतर्गत 1 बीएचके व 2 बीएचके’ स्वप्नपूर्ती घरकुल योजना’ मौजा-नारी भागात उभारण्यात येणार आहे. 1 बीएचके घरकुल 350.37 चौरस फूट तर 2 बीएचके घरकुलाचे 484.38 चौरस फूट इतके चटई क्षेत्रफळ राहणार आहे. यात 1 बीएचके सदनिकांची संख्या 210 तर 2 बीएचके सदनिकांची संख्या 308 राहणार असून, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांना नियमाप्रमाणे आरक्षण लागू राहणार आहे. यावेळी मनपा आयुक्तांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय मनपा आयुक्तांनी एसआरए कॉलनी वीटाभट्टी, उपलवाडी येथपासून ते नारी पर्यंत प्रस्तावित डीपी मार्गाची पाहणी करून जमिनीचे टीडीआर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. एसआरए कॉलनीमध्ये नियमित साफसफाई ठेवणे, कॉलनीमधील दुकानांचे वाटप लवकर करणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता ग्रीन जीम, मुलांकरिता प्ले ग्राउंड आणि वॉकिंग ट्रॅकसह उद्यान विकसित करावे, कॉलोनी साठी युनिफाईड एसटीपी तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय कामगार कॉलनी ज्या ठिकाणी तयार होणार आहे त्या जागेवर साफसफाई करणे आवश्यक ठिकाणी वृक्षारोपण करणे असे त्यांनी निर्देश मनपा आयुक्त यांनी दिले.