– स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अंतर्गत मनपा मुख्यालयात ही विशेष केंद्र
नागपूर :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी होणाऱ्या स्वच्छतेनंतर निघणाऱ्या निरुपयोगी वस्तूंच्या कचऱ्याचा योग्य आणि सुरक्षित निपटारा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियान राबवित अत्यंत स्तुत्य पाऊल उचले आहे. अभियानांतर्गत शहरातील विविध १०२ ठिकाणी निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र’ तयार करण्यात आले आहे. यातील सिव्हिल लाईन स्थित मनपा मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्राचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी(ता.१३) उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्यासह मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, जितेश धकाते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्तांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात जुने सामान, भंगार आणि ई-कचरा बाहेर पडतो. या कचऱ्यामुळे शहरात अस्वच्छता पसरू नये, याकरिता मनपाद्वारे हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी मनपाच्या केंद्रांवर मोठ्या संख्येत निरुपयोगी वस्तू दान कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यामधील प्राप्त झालेल्या वस्तूंचे वितरण गरजूलोकांना करण्यात येईल. तसेच प्राप्त कपड्यांतून कापडी पिशवी तयार केली जाणार आहे.

निरुपयोगी वस्तू स्वीकार केंद्र नागरिकांना त्यांच्या घरातील जुने फर्निचर, तुटलेले प्लास्टिकचे सामान, ई-कचरा आणि इतर निरुपयोगी वस्तू सोपवण्यासाठी हक्काचे ठिकाण बनेल. यामुळे हा कचरा रस्त्यावर किंवा कचराकुंडीत न टाकता थेट मनपाकडे सुपूर्द करता येईल, ज्यामुळे शहराची स्वच्छता टिकून राहण्यास मदत होईल. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन दिवाळी खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि शुभ करावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
दानदात्यांना ‘थँक यू’ स्टिकर्स
‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ अभियानाच्या अंतर्गत घरातील निरुपयोगी, पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू, जुने कपडे, गादी, ई-कचरा, प्लास्टिकच्या वस्तू, जुनी पुस्तके, वर्तमानत्रांची रद्दी, काचेच्या वस्तू आदी साहित्य मनपाच्या स्वीकार केंद्रावर जमा करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घर व सोसायटीच्या दारावर लावण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘थँक यू’चे स्टिकर्स दिले जात आहेत.




