– कस्तुरचंद पार्क येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन समारंभात सहभाग
नागपूर :- भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ २६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मा. राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कस्तुरचंद पार्क येथे साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनात सक्रीय सहभाग नोंदविणार आहेत. मनपाच्या संजयनगर माध्यमिक शाळेचे ११० विद्यार्थी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करीत देशभक्तीची भावना वृदिंगत करणार आहेत. तसेच संजयनगर माध्यमिक शाळेचे आणि मनपाच्या विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी पथसंचलनात सहभागी होणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात व शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या देखरेखीत मनपाचे शालेय विद्यार्थी सदर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मनपाच्या संजयनगर माध्यमिक शाळा आणि विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेचे प्रत्येकी ३० विद्यार्थी पथसंचलनात सहभागी होणार आहे. याशिवाय संजयनगर माध्यमिक शाळेच्या ११० विद्यार्थांचा चमू देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करणार आहे. नृत्याची रंगीत तालीम पूर्ण झाली असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.