spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डेंग्यू नियंत्रणासाठी मनपाची व्यापक मोहीम

– नागरिकांना लोकसहभागाचे आवाहन

नागपूर :- दरवर्षीप्रमाणे १६ मे हा दिवस जगभर “जागतिक डेंग्यू दिवस” म्हणून पाळला जातो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली असून यंदा डेंग्यू प्रतिबंधासाठी लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण १० रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” ही संकल्पना जाहीर केली असून, त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सदर मोहीम ही नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असून, उप महापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते नरेंद्र ( बाल्या) बोरकर, वैद्यकीय आरोग्य सभापती  मनिषा अतकरे यांच्यासह आयुक्त डॉ विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर,अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार,हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ मंजुषा मठपती यांच्या देखरेखीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

डेंग्यू हा ‘एडिस इजिप्ती’ या डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हे डास प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात उत्पन्न होतात व दिवसा चावतात. घरातील कूलर, ड्रम, कुंड्यांचे ट्रे, जुने टायर्स तसेच छतावरील कचऱ्यात साचलेले पाणी डेंग्यूच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरते.

डेंग्यूची प्रमुख लक्षणे म्हणजे अचानक तीव्र ताप येणे, असह्य डोकेदुखी, डोळ्यांच्या मागील भागात वेदना, सांधे व स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अंगावर लाल चट्टे येणे, अशक्तपणा, मळमळ व उलट्या होणे इत्यादी. अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या UPHC केंद्राला दाखवा असे आवाहन हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ मंजुषा मठपती यांनी केले आहे.

डेंग्यू नियंत्रणासाठी नागपूर महानगरपालिकेमार्फत शहरात युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी सर्वेक्षण, कंटेनर सर्व्हे, डासांच्या अळ्यांचा शोध व अळीनाशक फवारणी, फॉगिंग तसेच संशयित रुग्णांच्या रक्तनमुने तपासणीचा समावेश आहे.

नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील कूलर, ड्रम व पाण्याचे साठे पूर्णपणे रिकामे करून कोरडे ठेवावेत. पिण्याचे व वापराचे पाणी झाकून ठेवावे, परिसर स्वच्छ राखावा तसेच डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी, जाळ्या व पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

“डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, नागपूर शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.