spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीयकृत बँकांनी 30 जूलैपुर्वी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करावे -विजयलक्ष्मी बिदरी.

पीक कर्ज वाटपासाठी गावनिहाय कर्ज मेळावे घ्या

जिल्हाधिकाऱ्यांनी बँकनिहाय आढावा घेवून उद्दीष्टपूर्ती करावी.

शेतकऱ्यांना मागणीनूसार 2 लाखांपर्यंत विनातारण कर्ज

किसान क्रेडीटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा

 नागपूर, दि 01 : विभागात समाधानकारक पाऊस पडत असल्यामूळे पेरण्यांना सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनूसार सहज व सुलभ खरीप पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी बँक शाखानिहाय तसेच प्रत्येक गावांत कर्जवाटप मेळावे घेवून दिलेल्या उद्दीष्टांप्रमाणे 30 जूलैपुर्वी कर्जपुरवठा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात खरीप पीक कर्जवाटपासंदर्भात विविध बँकांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना  बिदरी बोलत होत्या. यावेळी महसूल उपायुक्त राजेश खवले, विभागीय सहनिबंधक प्रविण वानखडे तसेच सर्व बँकांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय खरीप पीक कर्जाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे.  त्यानूसार बँकांनी दिलेले उद्दीष्ट अद्याप पूर्ण केले नाही, अशा सर्व बँकांनी  विशेष मोहिम राबवून 30 जूलैपुर्वी उद्दीष्टपूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना  बिदरी यांनी दिल्या. खरीप पीक कर्जवाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बँकनिहाय आढावा घेवून जिल्ह्यात दिलेले उद्दीष्ट पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे. खरीप पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचे वाटप किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून करण्यात यावे. यासाठी 2 लाख रूपयापर्यंत विना तारण  कर्ज , खरीप पीक कर्ज वाटपाच्या अर्जावार तात्काळ निर्णय घेण्यात येवून सर्व शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश  यावेळी  दिले. प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांना खरीप कर्ज वाटपासाठी दिलेल्या उद्दीष्टांपैकी अत्यल्प कर्ज पुरवठा केला आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया केवळ 36 टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र 30 टक्के, कॅनेरा बँक 13 टक्के, सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया 22 टक्के, इंडियन बँक 14 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 30 टक्के, युको बँक 12 टक्के, युनियन बँक ऑफ इंडिया 14 टक्के, पंजाब नॅशनल बँक 11 टक्के तर बँक ऑफ बडोदा व इंडियन ओव्हरसिस बँकांनी 7 टक्के एचडीएफसी व आयसीआसी बँक प्रत्येकी 22 टक्के तर आयडीबीआय बँकेने 26 टक्के, महाराष्ट्र ग्रामीण व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सरासरी 50 टक्के  खरीप कर्ज वाटप केले असून या सर्व बँकांनी कर्ज वाटपासाठी बँकनिहाय पीक कर्ज मेळावे घेवून 30 जूलै पुर्वी उद्दीष्टपूर्ण करावे असे निर्देश   बिदरी यांनी दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या उद्दीष्टांपैकी 90 टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रारंभी महसूल उपायुक्त राजेश खवले व विभागीय सहनिबंधक प्रविण वानखडे यांनी विभागात जिल्हानिहाय खरीप कर्ज पुरवठ्यासंदर्भात बँकनिहाय आढावा सादर केला. खरीप पीक कर्ज वाटपासंदर्भात राष्ट्रीकृत बँका, खाजगी बँका तसेच सहकारी बँकांमध्ये समन्वय ठेवून शेतकऱ्यांना आवश्यकतेनूसार सुलभ कर्ज उपलब्ध होण्यासाठी महसूल, सहकार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्ज मेळाव्यास उपस्थित राहण्याचे सूचना करण्यात आल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.