spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नीट आणि टीईटी पेपर फुटीवरून सरकारवर ओबीसी क्रांती मोर्चाचा घणाघात; ‘सरकारचाच हात’ असल्याचा संजय मते यांचा खळबळजनक आरोप

हंसराज भंडारा :- ‘नीट’ परीक्षेचा गोंधळ अजून थांबलेला नसतानाच आता ‘टीईटी’ परीक्षेचाही पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे काम सरकार करीत आहे. ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली, ही केवळ प्रशासनाची चूक नसून संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे, अशी टीका ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केली आहे.

वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या आई-वडिलांनी घाम गाळून केलेल्या खर्चाची किंमत या सरकारच्या दृष्टीने शून्य झाली आहे का? असा संतप्त सवाल संजय मते यांनी उपस्थित केला आहे. एकामागून एक पेपर फुटत आहेत, परीक्षा रद्द होत आहेत आणि तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना केवळ खुर्च्या वाचवण्यात, पक्ष फोडण्यात आणि सत्तेचे गणित जुळवण्यातच अधिक रस दिसून येत आहे, असेही त्यांनी म्हटले.

हा केवळ पेपर लीक नसून महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या भविष्याचा केलेला विश्वासघात आहे. विद्यार्थ्यांना न्याय हवा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी, अन्यथा ही तरुण पिढी या अन्यायाचा हिशोब नक्कीच मागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वारंवार घडणाऱ्या या पेपर फुटीच्या घटना पाहता, यात सरकारचाच हात तर नाही ना? असा गंभीर आरोपही संजय मते यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणाने आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Popular Articles