हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू’ अशा शब्दांत ज्यांचे गौरवगान केले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजा भोजापूर (ता. जि. भंडारा) येथील अपूर्वा कॉलनीमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत ‘स्वच्छता मोहीम’ राबवली. केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून महाराजांना अभिवादन करत, ग्रामस्थांनी स्वच्छ व निरोगी आरोग्याचा संदेश दिला.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवरायांनी वयाच्या १५ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकण्यापासून ते अफझलखानाचे पारिपत्य आणि आग्र्याहून सुटका अशा अनेक पराक्रमांनी त्यांनी इतिहास घडवला. महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते प्रजेची काळजी घेणारे ‘रयतेचे राजे’ होते. त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत, भोजापूर येथील नागरिकांनी आपल्या परिसराची साफसफाई करून जयंती साजरी केली.
या स्वच्छता मोहिमेत परिसरातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रामुख्याने शामलता कोहपरे, स्नेहल साखरवाडे, कुलभित भजेपूरे, माधूरी साठवणे, विजय लांडगे, किशोर दंडारे, पायल बोकरक, शोभा लिमजे, केशव चचाणे, किरण भजेभूजे आणि ग्रामपंचायत सदस्या योगिता धांडे यांची उपस्थिती होती. तसेच पंकज सार्वे, सफाई कामगार महेश मेश्राम आणि पुष्पराज नंदनवार यांनीही या मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
स्त्री सन्मान, अष्टप्रधान मंडळाची शिस्त, आरमाराचे जनक आणि गनिमी काव्याचे निर्माते असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला. “स्वच्छ परिसर, निरोगी आरोग्य” हीच महाराजांना खरी मानवंदना ठरेल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.