Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

– गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ सज्ज

नवी  दिल्ली :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडवेल.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून ज्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, तिच चळवळ आज आधुनिक भारताला कशी ‘आत्मनिर्भर’ बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असून, या उत्सवामुळे केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते, हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.

कसा असेल चित्ररथ?

महाराष्ट्राच्या या चित्ररथाची रचना अत्यंत कलात्मक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला एक भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपारिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्रीशक्तीचे दर्शन घडवेल. चित्ररथाच्या मध्यभागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभक्त दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, इतर सांस्कृतिक बाबींचेही बारकाव्यांसह दर्शन घडवण्यात आले आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक असेल.

यंदाचा हा सोहळा ‘जनभागीदारी’वर आधारित असून, संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित होणाऱ्या ‘भारत पर्व’मध्ये देखील देशवासियांना महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com