नागपूर :- शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना सन २०२५ पासूनच्या विविध कृषी पुरस्कार संदर्भातील अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असून इच्छुकांनी शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला तसेच संस्थांचा कृषी विभागामार्फत सन्मान करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (संद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश असून हे पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरुपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.
या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या अर्ज सादर करता येणार, ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलद गतीने होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्र पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही, अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती अर्जदारांना सहज मिळणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार असल्याचे, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी कळविले आहे.




