Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

भोजापूर रेतीघाटावर पवनी पोलिसांचा छापा; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ जणांवर गुन्हा दाखल

हंसराज,प्रतिनिधी भंडारा पवनी :- येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजा भोजापूर रेतीघाटावर पोलिसांनी धाड टाकून अवैध रेती उपसा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४० लाख रुपये किमतीचा जे.सी.बी. जप्त करण्यात आला असून, रेतीचोरी प्रकरणी एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिसरात गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यावेळी पोलीस शिपाई चांदकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भोजापूर रेतीघाटावर विनापरवाना रेतीचा उपसा सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने रेतीघाटावर छापा टाकला.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, आरोपी जे.सी.बी. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करून चोरी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाठलाग केला असता, जे.सी.बी. चालक उत्तम खोब्रागडे (रा. भोजापूर), अंबिका हिंगमिरे (रा. वर्धा) आणि दिवानजी देवेंद्र पडोळे (रा. भोजापूर) हे पोलिसांच्या हाती लागले. मात्र, ट्रॅक्टर चालक/मालक जनार्दन पडोळे (रा. भोजापूर) हा ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या कारवाईत पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा जे.सी.बी. (क्रमांक एम.एच. ४०/पी. १४८१) जप्त केला आहे. सर्व आरोपींनी संगनमत करून शासनाच्या महसूल विभागाची नजर चुकवून रेतीची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई चांदकर यांच्या तक्रारीवरून पवनी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ई), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई चांदकर, बागडे आणि मोहरकर यांनी केली. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com