spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बेसा – पिपळाच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर :- बेसा-पिपळा नगरपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठ्यातील अनियमितता टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून येथील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बेसा-पिपळा नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेचा आज सविस्तर आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बेसा – पिपळाच्या नगराध्यक्षा कीर्ती बडोले, उपाध्यक्ष नरेश भोयर यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक मोहिते, मुख्याधिकारी भारत नंदनवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जलशुद्धीकरण केंद्रातून दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी पाणी सोडताना सतर्कता बाळगावी, बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्याच्या अनधिकृत जोडण्या शोधून त्या तात्काळ खंडित कराव्यात व जलस्रोतापासून पाणी वाहून आणताना त्यात होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु येथील काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसून योग्य नियोजनातूनच कायमस्वरूपी उपाययोजना करता येणे शक्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एनएमआरडीए व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी समन्वयातून कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रातील त्रुटी दूर करून मानकांनुसार नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासह पाणीगळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा व त्याबाबतचा अहवाल मुदतीत सादर करण्याचे आदेश त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला यावेळी दिले.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मौजा पिपळा, घोगली, बेसा व बेलतरोडी येथील पट्टे वाटप तात्काळ पूर्ण करावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत नागरिकांसाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, अशा मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी. आयुष्मान कार्ड वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.