Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन

Ø पालकमंत्री ना. संजय राठोड व आदिवासी विकास मंत्री ना. प्रा अशोक उईके यांनी घेतला आढावा

यवतमाळ :- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात १० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री ना.प्रा. अशोक उईके यांनी या योजनेचा सविस्तर आढावा शुक्रवारी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आयोजित बैठकीस आमदार राजू तोडसाम, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मुख्य वनसंरक्षक अभिजीत वायकोस, प्रकल्प अधिकारी अमित रंजन तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ता हा अत्यंत जीव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या दैनंदिन शेतीकामांसाठी तसेच उत्पादन बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी या रस्त्यांची गरज आहे. या योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजेत. रस्त्यांचे काम दर्जेदार झाले पाहिजेत. पुढील काळात या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आराखडा तयार करून कामे करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी दिले.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून अलर्ट मोडवर काम करावे, या योजनेच्या कामांना प्राधान्याने गती द्यावी आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल याची काळजी घ्यावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री ना. प्रा. अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेत व पाणंद रस्ते कामांचे नियोजन, पूर्वतयारी, अडचणी तसेच निधी उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा शुभारंभ करावा, असा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com