हंसराज,भंडारा पवणी :- जिल्ह्यात अवैध रेती तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत 14 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पवनी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेलारी शिवारातील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी हे कोणतीही वैध परवानगी नसताना ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणात अजय चंद्रभान देवाडे (वय 24, रा. कांपा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) आणि नितेश दुयोधन श्रीरामे (वय 33, रा. कवडसी/देश, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) यांना आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली आणि अंदाजे 1 ब्रास रेती असा एकूण 14,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 244/2026 अंतर्गत कलम ३०५ (ई )कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली.