हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- शहरातील विद्यानगर परिसरात घरामध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भंडारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) संयुक्तपणे ही कारवाई केली असून, एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा येथील ज्ञानेश्वर वार्ड, विद्यानगर भागात अवैध देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १० जानेवारी २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचला. पथकाने एक बनावट ग्राहक तयार करून संबंधित ठिकाणी पाठवले. बनावट ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी घरावर छापा टाकला.
या कारवाईत आरोपी महिला संगीता विलास घारगावे ही आपल्या राहत्या घरी पीडित महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून २०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध अपराध क्रमांक ८२/२०२६, कलम ३, ४, ५(१) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड, पो.हवा. अंकुश गाढवे, पो.ना. अंकोश पुराम, पो.शि. योगेश ढबाले, कौशिक गजभिये, महिला पो.हवा. अर्चना कुथे, मंजुषा घरडे आणि मानिक किरसान यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील अवैध मानवी तस्करी आणि देहव्यापार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात असून, या कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.