spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिक अनुसूचित जाती-जमातीच्या युवकांना रोजगार द्या; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सकारात्मक आश्वासन

नागपूर :- कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात स्थानिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भीम सेनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी महसूलमंत्री तथा कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात भेट घेतली व निवेदन सादर केले. भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनात कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या विस्तारासह विविध प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराचा प्राधान्याने अधिकार मिळावा तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बेरोजगारांना नियुक्तीत अग्रक्रम देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाची गंभीर दखल घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून उपलब्ध रिक्त पदांची माहिती तातडीने मागवून घेतली. तसेच उपस्थित पात्र बेरोजगार युवकांना दोन दिवसांच्या आत रुजू करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मंत्री महोदयांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे उपस्थित युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी भीम सेनेच्या वतीने तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि पंचशीलाचा दुपट्टा भेट देऊन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत त्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल व तत्परतेबद्दल भीम सेनेने त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला भीम सेनेचे सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये नागपूर शहराध्यक्ष विकास बागुल, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष इमरान कुरेशी, पूर्व नागपूर अध्यक्ष कैलाश शेंडे तसेच महिला पदाधिकारी ज्योती सोमकुवर, द्रौपदी प्रधान, शीला बिसेन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपामुळे कोराडी परिसरातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या स्थानिक युवकांना लवकरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सामाजिक न्यायाच्या भावनेला बळ मिळेल, अशी अपेक्षा भीम सेनेने व्यक्त केली.

Popular Articles