यासीन शेख, गोंदिया :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव/बंध्या तसेच परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींच्या कळपामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी राज्याचे माजी मंत्री तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार ईंजी. राजकुमार बडोले तथा जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली. यावेळी वनविभाग, महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर आढावा घेतला.
अलीकडील काही दिवसांत या भागात हत्तींच्या कळपाने शेतांमध्ये घुसून मका तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून सिंचनासाठी बसविण्यात आलेल्या पाईपलाईन व इतर साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसला आहे.
नुकसानग्रस्त शेतांमध्ये जाऊन आमदार बडोले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून योग्य सर्वेक्षण करावे व शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार,आर.एम.बहुरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाथोडे, माजी सभापती प्रकाश गहाणे, कृ.उ.बा.स. संचालक लोकपाल गहाणे,व्यंकट खोब्रागडे,नानाभाऊ शहारे,नंदकुमार गहाणे, भोजराज लोगडे, विलास बोरकर, सुरेंद्रकुमार ठवरे,सरपंच घनश्याम शहारे,उपसरपंच विजय मरसकोल्हे, योगेश नाकाडे,ग्रामपंचायत अधिकारी विजय खुणे,अनिल लाडे,मंडळ अधिकारी कुंभरे, तसेच इतर जनप्रतिनिधी, वनविभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.




