Wednesday, March 11, 2026
spot_imgspot_img
spot_img

सायबर फसवणूक रोखण्यासाठी जनजागृतीकरिता ४३ कोटींची तरतूद – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई :- तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ऑनलाईन गेमिंगमधील आर्थिक गैरव्यवहार आणि ई-चलनांच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ४३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत दरमहा राज्यातील नागरिकांना २१ कोटी जनजागृतीपर मेसेजेस पाठवले जाणार आहेत. सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारला होता.

राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगबाबत कडक कायदे केल्यानंतर आता राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली आहे. विशेषतः पुणे आणि गोवा यांसारख्या भागांत ई-चलन किंवा ई-पीक पाहणीच्या नावाखाली फेक लिंक्स पाठवून मोबाईलमधील डेटा आणि पैसे चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे ‘सायबर सुरक्षा मुख्यालय’ (महापे येथे) उभारण्यात आले आहे. संपूर्ण राज्यामध्ये ५० विशेष सायबर पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. केवळ ‘सीडीआर’ काढून गुन्हेगार सापडत नाहीत, त्यामुळे डार्क वेबवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असणारी आधुनिक ‘टूल्स’ सरकारने उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘महा सायबर सेफ’ ॲप हे अधिकृत ॲप्लिकेशन लाँच करण्यात येत आहे. ज्यावर सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींची माहिती मिळेल असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य विकास ठाकूर, बबन लोणीकर – यादव, ॲड राहुल कुल यांनी सहभाग घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com