spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘एमपीएससी’च्या जाहिरातीतून ‘पीएसआय’ पद गायब! राज्यात दोन हजार जागा रिक्त असतानाही उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर

 

नागपूर ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या यंदाच्या जाहिरातीत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांचा समावेश करण्यात आलेला नाही, ही बाब राज्यभरातील हजारो उमेदवारांसाठी धक्कादायक ठरली आहे. पोलिस दलात सध्या सुमारे २ हजारांहून अधिक पीएसआय पदे रिक्त असूनही यंदाच्या भरती प्रक्रियेत या पदांचा समावेश न करणे ही राज्य सरकारची उदासीनता असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

एमपीएससीमार्फत दरवर्षी पीएसआय, राज्य कर निरीक्षक (STI), आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा केवळ ASO साठी ३ जागा आणि STI साठी २७९ जागा असल्याचे आयोगाने घोषित केले आहे. एकूण २८२ जागांसाठी परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ४८० जागांसाठी भरती प्रक्रिया झाली होती, त्यामुळे यंदा केवळ जागा कमी झाल्या नाहीत, तर महत्त्वाचं पीएसआय पदही वगळलं गेलं आहे.

विद्यार्थ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, “एमपीएससीची ही जाहिरात आमच्या आशांवर पाणी फेरणारी आहे. पीएसआयसारख्या महत्त्वाच्या पदासाठी एकही जागा नसणे हे न्याय्य नाही.”

यावर एमपीएससीने स्पष्टीकरण दिलं आहे की, जाहिरातीमध्ये फक्त त्या पदांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांची मागणी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत संबंधित विभागांकडून प्राप्त झाली आहे. इतर संवर्गातील पदांचा समावेश भविष्यातील टप्प्यांमध्ये, पूर्वपरीक्षेचा निकाल प्रसिद्ध होण्याआधी केला जाऊ शकतो. त्यामुळे शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्रे मिळाल्यास, त्याचा विचार भरती प्रक्रियेमध्ये केला जाणार आहे, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

उमेदवारांना १ ते २१ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे. पूर्वपरीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पुढील टप्प्यावर संधी दिली जाईल. मुख्य परीक्षेच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.

Popular Articles