spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“गुन्हेगारी सोडा, अन्यथा जिल्हा सोडा!” – एसपी नूरुल हसन यांचा सज्जड दम; एकाच महिन्यात ६ कुख्यात टोळ्यांवर ‘मकोका’चा प्रहार

हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांनी निर्माण केलेली दहशत मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. “जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा देत पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी एकाच महिन्यात ६ वेगवेगळ्या टोळ्यांमधील ३० पेक्षा जास्त गुन्हेगारांवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या १० वर्षांत जेवढी कारवाई झाली नाही, त्यापेक्षा मोठी कारवाई केवळ जुलै २०२६ मध्ये करण्यात आली आहे.

• ‘गणेशपुर टोळी’चे नेटवर्क उद्ध्वस्त पत्रकार परिषदेत माहिती देताना एसपी नूरुल हसन यांनी सांगितले की, भंडारा शहरातील गणेशपुर परिसरात दहशत पसरवणाऱ्या चिराग नमोद गजभिये (२८) आणि त्याच्या १५ साथीदारांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला यांसारखे गंभीर गुन्हे आहेत. यात सागर भुरे, आकाश बोरकर, श्याम साठवणे यांसह एकूण १४ सदस्यांचा समावेश असून काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (BNS कलम ३१०(२), ३११, १२६(२) ३२४(४) सह मकोका कलम ३(१), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा).

• ३५ गुन्हे असलेली ‘चंगू-मंगू टोळी’ गजाआड लाखनी परिसरातील कुख्यात ‘चंगू-मंगू’ टोळीवर कारवाई करताना एसपींनी सांगितले की, भीमराज मेश्राम (३२) आणि धम्मराज मेश्राम (२९) यांनी गेल्या १० वर्षांत घरफोडी आणि खुनाच्या प्रयत्नासारखे ३५ गुन्हे केले आहेत. ही टोळी कडी-कोंडा तोडून घरात शिरणे आणि सोन्या-चांदीची लूट करण्यात सराईत होती. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत होते, मात्र आता ही टोळी मकोकाखाली जेरबंद झाली आहे.

• जनावरांची तस्करी करणाऱ्या ‘सम्राट टोळी’चा पर्दाफाश गोहत्या आणि जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या सम्राट कांतीलाल येवले (३३, रा. गोंदिया) आणि त्याच्या ७ सदस्यांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीवर भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात ९ गुन्हे दाखल आहेत. हर्षल श्रावणकर, शुभम भुरे यांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही यात समावेश आहे.

• ड्रग्ज माफिया ‘नंदनवन टोळी’वर मोठी कारवाई तरुणाईला ‘एम.डी.’ (MD) ड्रग्जच्या जाळ्यात ओढणाऱ्या नंदनवन टोळीचा प्रमुख कपिल गंगाधर खोब्रागडे (४१, रा. नागपूर) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३ लाख ४७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात ६३.२९० मिलीग्राम एम.डी. ड्रग्ज आणि ७९,९६० रुपयांची रोकड सामील आहे. ही टोळी नागपूरवरून भंडाऱ्यात ड्रग्ज पुरवत असल्याची धक्कादायक माहिती हसन यांनी दिली.

• ७६ गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेली ‘महिलांगे टोळी’ सर्वात मोठी कारवाई नरेश अंकालु महिलांगे (३२, रा. नागपूर) याच्यावर करण्यात आली आहे. या टोळीने महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात मिळून ७६ घरफोड्या केल्या आहेत. नरेश हा कारागृहातून बाहेर आला की पुन्हा नवीन मुले गोळा करून टोळी बनवायचा. मकोका लागल्यामुळे आता या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

• ‘टप्पा मोहल्ला टोळी’चा हिंसक धुमाकूळ थांबला भंडारा शहरातील टप्पा मोहल्ला येथील मयंक रवींद्र तिवारी (२५) आणि त्याच्या टोळीवर खून, खंडणी आणि जबरी चोरीचे ७ गंभीर गुन्हे आहेत. चेतन तिघरे आणि रितेश कोडवदे या सदस्यांसह या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे.

१० वर्षांतील ऐतिहासिक कारवाई : २०१५ ते २०२५ या १० वर्षांत जिल्ह्यात मकोकाचे मोजकेच गुन्हे दाखल झाले होते. मात्र, जुलै २०२६ पर्यन्त च्या महिन्यात ६ टोळ्यांवर मकोका लावून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.

ही संपूर्ण कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या गुन्ह्यांचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे (भंडारा), शिवम विसापुरे (साकोली) आणि ज्योतीका इंगळे (पवनी) हे करत आहेत.

“गुन्हेगारांनी आता एकतर गुन्हेगारी सोडावी किंवा जिल्हा सोडावा, अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरूच राहील,” असा कडक इशारा एसपी नूरुल हसन यांनी यावेळी दिला.

Popular Articles