spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रॅगींग फ्री कॅम्पस : पत्रकारिता विभागाची बांधिलकी

नागपूर १९ : नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना आनंददायी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण देणे ही जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाची परंपरा आहे आणि हीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागात अँटी-रॅगींग आठवड्यानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यूजीसीच्या नियमांनुसार दरवर्षी १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान अँटी-रॅगींग सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत विभागात १८ ऑगस्ट रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धावणकर आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद भिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रॅगींग म्हणजे नेमके काय?

चर्चेत बोलताना डॉ. धावणकर यांनी रॅगींगची व्याख्या सांगताना स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचा अपमान करणे, शिष्टाचारांचे उल्लंघन करणे, धमकावणे, हीन दर्जाची वागणूक देणे, हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणे किंवा हानी पोहोचवणे हे सर्व कृत्य रॅगींगमध्ये मोडते. अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते.

ज्येष्ठ पत्रकार आनंद भिसे यांनी रॅगींगचा परिणाम उलगडून सांगताना नमूद केले की रॅगींग अशा पद्धतीने केले जाते की विद्यार्थ्यांना लाज, भीती आणि संकोच वाटतो. कधी कधी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध गोष्टी करण्यास भाग पाडले जाते. प्रा. श्रुती सांगोडे यांनी रॅगींग हा छळ, धमकी तसेच शारीरिक आणि लैंगिक छळाचा प्रकार असल्याचे प्रतिपादन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व भावनिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते आणि ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होतात.

सहाय्यक प्रा. डॉ. मनीषा मोहोड यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसर, वसतिगृह अथवा शैक्षणिक संस्थेत कुठेही रॅगींगची घटना घडल्यास तक्रार कशी दाखल करता येईल याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थी अमोल राठोड आणि श्रद्धा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले, तर विनय निमगडे यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.

या चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना हे अधोरेखित करण्यात आले की “रॅगींग फ्री कॅम्पस हीच आपली परंपरा” असून सुरक्षित, सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

Popular Articles